आफ्रिकेकडून पराभूत; विश्वचषकातील आव्हान संपुष्टात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्राइस्टचर्च : गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील निराशाजनक कामगिरीचा भारतीय महिला क्रिकेट संघाला फटका बसला. रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

आफ्रिकेला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर तीन धावांची आवश्यकता असताना भारताची ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माने मिग्नन डूप्रीझला बाद केले; पण चेंडू टाकण्यापूर्वी दीप्तीचा पाय क्रीजच्या पुढील रेषेबाहेर गेल्याने तो ‘नो-बॉल’ ठरवण्यात आला. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर दोन धावा काढत आफ्रिकेने हा सामना तीन गडी राखून जिंकला. आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, गतविजेते इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताने ५० षटकांत ७ बाद २७४ अशी धावसंख्या उभारली. स्मृती मानधना (८४ चेंडूंत ७१ धावा) आणि शफाली वर्मा (४६ चेंडूंत ५३) यांनी भारताच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. यानंतर स्मृतीला कर्णधार मितालीची (८४ चेंडूंत ६८) साथ लाभली. तसेच अखेरच्या षटकांत हरमनप्रीत कौरही (५७ चेंडूंत ४८) चांगली खेळली.

प्रत्युत्तरात, लॉरा वोल्वार्द (७९ चेंडूंत ८०) आणि लारा गोडॉल (६९ चेंडूंत ४९) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १२५ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. मग डूप्रीझ (६३ चेंडूंत नाबाद ५२) आणि मारिझेन कॅप (३० चेंडूंत ३२)  यांच्या योगदानामुळे आफ्रिकेने २७५ धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठत सामना जिंकला.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ७ बाद २७४ (स्मृती मानधना ७१, मिताली राज ६८; मसाबाता क्लास २/३८) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ७ बाद २७५ (लॉरा वोल्वार्द ८०, मिग्नन डूप्रीझ नाबाद ५२; हरमनप्रीत २/४२)

’ सामनावीर : मिग्नन डूप्रीझ

निवृत्तीबाबतचा निर्णय काही काळाने -मिताली

भारताची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा होती. झुलनला दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्ध खेळता आले नाही आणि तिला विश्वचषकात आणखी एक सामना खेळण्याची संधी न दिल्याचे मितालीला दु:ख होते. तसेच तिने झुलन किंवा स्वत:च्या निवृत्तीबाबत स्पष्टपणे विधान करणे टाळले. ‘‘आम्हाला हा निकाल पचवण्यासाठी काही काळ लागेल. त्यानंतरच मी भवितव्याबाबतचा निर्णय घेऊ शकेन,’’ असे मितालीने नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India out of the womens world cup after losing to south africa zws