India out of T20 World Cup: युएईत सुरू असलेल्या महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध निसटत्या पराभवामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा सेमी फायनल प्रवेश पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील लढतीच्या निर्णयावर अवलंबून होता. या महत्त्वपूर्ण लढतीत न्यूझीलंडने अतिशय व्यावसायिक खेळ करत पाकिस्तानवर ५४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. पराभवासह पाकिस्तानचं आणि पर्यायाने भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाला होता. या दारुण पराभवामुळे भारतीय संघाच्या नेट रनरेटवरही परिणाम झाला होता. भारतीय संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवत पुनरागमन केलं. मात्र रविवारी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाचं भवितव्य पाकिस्तानच्या हाती गेलं. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ११० धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव ५६ धावांतच आटोपला.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने पहिल्या षटकात सात धावा काढल्या. एडन कार्सनने अलिया रियाझला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा अलियाचा प्रयत्न सोफी डेव्हाईनच्या हातात जाऊन विसावला. लिआ ताहूहूने पुढच्याच षटकात मुनीबाला त्रिफळाचीत केलं. डाऊन द ट्रॅक येत मोठा फटका खेळण्याचा तिचा प्रयत्न सपशेल फसला. कार्सनने दुसऱ्या षटकात एकही धाव दिली नाही. फ्रान जोनासने पहिल्याच चेंडूवर सदफ शमासला त्रिफळाचीत केलं. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि इरम जावेद धावबाद झाली. रोसमेरी मेअरने पहिल्याच षटकात सिदरा अमीनला त्रिफळाचीत केलं. पॉवरप्लेच्या सहा षटकात पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला.

न्यूझीलंडने अतिशय वेगाने षटकं टाकत पाकिस्तानला विचार करायला उसंतच दिली नाही. निदा दार आणि फातिमा साना यांनी सहाव्या विकेटसाठी २४ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अमेलिआ केरच्या फसव्या चेंडूवर दार फसली आणि विकेटकीपर गेझने क्षणार्धात बेल्स उडवल्या. तिने ९ धावा केल्या. कार्सनने स्वत:च्याच गोलंदाजीवर अफलातून झेप टिपत ओमामिआ सोहेलला तंबूत परतावलं. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सयदा अरुब शहा धावचीत झाली. केरने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सानाला बाद केलं आणि त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. फातिमाने २१ धावा करत एकाकी झुंज दिली. न्यूझीलंडतर्फे अमेलिआ केरने ३ तर एडन कार्सनने २ विकेट्स पटकावल्या. रोसमरी मेअर, लिआ ताहूहू आणि फ्रान जोनास यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

पाकिस्तानची कर्णधार फातिमा सानाने या सामन्याद्वारे पुनरागमन केलं. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे ती मायदेशी परतली होती. मात्र या लढतीचं महत्त्व लक्षात घेऊन ती परतली. तुबा हसनच्या जागी तिने पुनरागमन केलं. न्यूझीलंडने कास्पारेकच्या ऐवजी जोनासला संधी दिली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसऱ्याच चेंडूवर सुजी बेट्सने सानाच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचला. चौथ्या चेंडूवर बेट्सविरुद्ध पायचीतचं अपील झालं. पंचांनी बेट्सच्या बाजूने निकाल दिला. पाकिस्तानने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा पडल्याने बेट्सला जीवदान मिळालं. सादिआ इक्बालने पहिल्या षटकात अवघ्या तीन धावा दिल्या. सानाच्या पुढच्या षटकात बेट्स-जॉर्जिआ प्लिमर जोडीने १३ धावा वसूल केल्या. पुढच्याच षटकात प्लिमरने तटवलेला चेंडू अडवताना पाकिस्तानच्या दोन क्षेत्ररक्षकांची टक्कर झाली. दोघींवरही उपचार करण्यात आले. न्यूझीलंडने पॉवरप्लेच्या ६ षटकात ३९ धावांची मजल मारली.

ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात नशरा संधूने प्लिमरला तंबूत धाडलं. तिने १७ धावा केल्या. अमेलिआ केरला डावाच्या सुरुवातीलाच जीवदान मिळालं. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या बेट्सला संधूनेच बाद केलं. बेट्सनं २९ चेंडूत ३ चौकारांसह २८ धावांची खेळी केली. डावाच्या निम्म्या टप्प्यावर न्यूझीलंडने ५४ धावा केल्या. ओमामिआ सोहेलने अनुभवी केरला बाद करत पाकिस्तानला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. तिला ९ धावाच करता आल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. ब्रूक हालिडेने सयेदा अरुब शहाच्या गोलंदाजीवर दोन चौकार लगावले. निदा दारच्या गोलंदाजीवर सोफी डेव्हाईनचा झेल सुटला.

नशरा संधूने हालिडेला बाद करत जोडी फोडली. तिने २४ चेंडूत २२ धावांची खेळी केली. सादिआ इक्बालने सोफी डेव्हाइनला बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकलं. अनुभवी डेव्हाइनने १९ धावा केल्या. षटकांची गती न राखल्यामुळे पाकिस्तानला शेवटच्या षटकात ३० गज वर्तुळाबाहेर तीनच क्षेत्ररक्षक तैनात करता आले. पाकिस्तानचं क्षेत्ररक्षण ढिसाळ होऊनही न्यूझीलंडला जेमतेम शंभरीचा टप्पा ओलांडता आला.