भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये क्रिकेट मालिका होणार का, याबाबतच्या निर्णयासाठी आता क्रिकेटरसिकांना आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये नव्याने चर्चा सुरू असून, लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
बीसीसीआयने पाकिस्तानला क्रिकेट मालिकेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हा प्रस्ताव धुडकावला आहे. भारताविरुद्धची मालिका संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळू, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली आहे. अमिरातीमध्ये गेली काही वष्रे पाकिस्तानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळतो.
२०१४ मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा एक टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आला होता. मात्र त्यानंतर अमिरातीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआय अनुत्सुक असतो, याबाबत विचारले असता ठाकूर यांनी मौन बाळगले.
‘‘कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पध्रेच्या ठिकाणाचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा आशियाई क्रिकेट परिषद घेते. मात्र दोन देशांमधील मालिकेच्या ठिकाणाचा निर्णय ते दोन देश घेतात,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.

Story img Loader