PCB on Jay Shah: आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACCने आशिया कपचा सुपर-४ टप्पा हंबनटोटा येथे हलवण्याचा निर्णय बदलला आहे. हवामान अंदाजात थोडीशी सुधारणा पाहून एसीसीने स्थळ बदलण्याचा निर्णय बदलला. त्यानंतर पीसीबीने पुन्हा एकदा बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी माजी पीसीबी प्रमुखांनी सोशल मीडियावर असेही लिहिले की, “भारत पाकिस्तानसोबत सामने खेळण्यास घाबरतो.”
नुकतेच कोलंबोतील खराब हवामानामुळे एसीसीने आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ सामने येथून हंबनटोटा येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा निर्णय बदलत परिषदेने कोलंबो हे ठिकाणच जैसे थे ठेवले आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि जय शाह पुन्हा आमनेसामने आले आहेत. एसीसीने बोर्डाच्या सर्व सदस्य देशांना पाठवलेल्या आणि नंतर मागे घेतलेल्या गूढ ई-मेलचा पाकिस्तानी प्रसारमाध्यमेही सातत्याने उल्लेख करत आहेत. मेलमध्ये सुपर-४ सामने कोलंबोहून हंबनटोटा येथे हलवण्याचा उल्लेख आहे.
नजम सेठी म्हणाले, ‘भारत पाकिस्तानला घाबरतो‘
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख नजम सेठी यांनी ट्वीटरवर ट्वीट केले की, “बीसीसीआय/एसीसीने पीसीबीला कळवले की त्यांनी पुढील भारत-पाक सामना कोलंबो येथून हंबनटोटा येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. तासाभरातच त्याने आपला विचार बदलला आणि कोलंबो हे ठिकाण जैसे थे राहील त्यात कुठलाही बदल होणार नाही, असे घोषित केले. हे नक्की काय चालू आहे? भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाची भीती आहे का? यावरून एकच कळते की भारत पाकिस्तानला घाबरतो. पावसाचा अंदाज बघा!”
या ट्वीटमध्ये सेठी यांनी हंबनटोटा आणि कोलंबोचा हवामान अहवालही अपलोड केला आहे. ज्यामध्ये हंबनटोटामध्ये अनेक दिवस हवामान स्वच्छ आहे आणि कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. महत्वाची बाब अशी आहे की, सुपर-४ टप्प्यातील भारत आणि पाकिस्तान सामना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील गट टप्प्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. यावेळी पाऊस खोडा घालणार अशी चिन्हे दिसत आहेत. यावर आता जय शाह आणि एसीसी काय प्रत्युतर देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आशिया कप २०२३चे सुपर-४ सामने कधी आणि कुठे खेळवले जातील?
आशिया चषक सुपर-४चे सामने ६ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. सुपर-४ची सुरुवात ६ सप्टेंबरला पाकिस्तान आणि ग्रुप बी दुसऱ्या स्थानावर असलेल्या बांगलादेशसोबत होईल. तसेच, ग्रुप बीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतासोबत १५ सप्टेंबरला त्यांचा सामना खेळवला जाईल. सुपर-४ मध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत. कोलंबो आणि लाहोरमध्ये सुपर-४ सामने खेळवले जातील.
आशिया कप २०२३ सुपर-४ वेळापत्रक
०६सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, लाहोर, दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
०९ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो, दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१० सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१२ सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१४ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
१५ सप्टेंबर: भारत विरुद्ध बांगलादेश, कोलंबो, दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)