वर्ल्डकप दर चार वर्षांनी आयोजित होतो. या स्पर्धेतला बहुचर्चित सामना म्हणजे भारत-पाकिस्तान. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला सामना. सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असणारा सामना अशा असंख्य बिरुदावल्या या सामन्याला असतात. दोन्ही देशांमधले संबंध दुरावलेले असल्याने भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात नाही. पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. यामुळे आयसीसीच्या स्पर्धा तसंच आशिया चषक वगळता अन्य स्पर्धात भारत-पाकिस्तान आमनेसामने येतच नाहीत. त्यामुळे जेव्हाही वर्ल्डकपचे सामने जाहीर होतात तेव्हा पहिलं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे असतं. थोड्या वेळात भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरू होईल. सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने जुगलबंदी रंगेल. सामन्याच्या निमित्ताने अहमदाबाद शहरही भारत-पाकमय झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यांच्या तिकिटांची विक्री ब्लॅकने होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गार्डियन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार २५०० रुपयांचं तिकीट ब्लॅकमध्ये २५,००० रुपयांना विकलं गेल्याचं म्हटलं आहे. सामन्याचा आनंद याचि देही याचि डोळा लुटण्यासाठी काहींनी लाखभर रुपये मोजल्याचं समोर येत आहे. हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये बसण्यासाठी १.९ दशलक्ष रुपये मोजल्याची चर्चा आहे. या बॉक्समध्ये १५जण सामन्याचा आनंद घेऊ शकतात. या सामन्यासाठी मुंबईहून खास दोन ट्रेन्स रवाना झाल्या आहेत.

सामन्यासाठीच्या तिकिटांपुरतं हे मर्यादित नाही. हॉटेल्समध्ये सोल्ड आऊटचे फलक झळकत आहेत. मात्र विनंती आर्जव केल्यानंतर त्याच हॉटेलमधली रुम अव्वाच्या सव्वा किमतीला देण्यात येत आहे. या खोलीसाठी नेहमीच्या दराच्या १० ते २० पट अधिक रक्कम मोजावी लागत आहे. हॉटेलमध्ये एवढे पैसे मोजण्याऐवजी अमेरिकेतून खास या सामन्यासाठी दाखल झालेल्या भारतीय चाहत्यांनी स्थानिक हॉस्पिटलच बुक केलं. रुटीन चेकअपसाठी दाखल होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सामन्याआधी काही तास आल्यानंतर डोक्यावर हक्काचं छप्पर असावं यासाठी त्यांनी मेडिकल टूरिझमचा फंडा अवलंबला आहे.

खाजगी नर्सिंग होम आणि छोट्या हॉस्पिटल्सना हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही दर वाढवत उखळ पांढरं केलं आहे. सामन्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या चाचण्या आणि बाकी प्रक्रियेसाठी पैसे घेत असल्याचे दाखवता येणार असल्याने हॉस्पिटल प्रशासनासाठी हा सुगीचा काळ ठरला आहे. प्रत्यक्षात चाचण्या न करताही त्यांना पैसा मिळणार आहे.

सामन्यासाठी आलेल्या चाहत्यांनी हेल्थचेकअपसाठी बुकिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी त्यांनी हॉस्पिटलात मुक्काम केला आहे असं अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तुषार पटेल यांनी गार्डियनच्या प्रतिनिधीला सांगितलं. अहमदाबाद मेडिकल असोसिएशनने यासंदर्भात हॉस्पिटलला सूचित करत खऱ्याखुऱ्या रुग्णांनाच भरती करुन घेण्याचं सांगितलं आहे. पण मेडिकल टूरिझमच्या आडून भारत-पाकिस्तान सामना बघायला आलेल्या मंडळींना रोखणं त्यांनाही कठीण आहे.

तिकिटांचे गगनचुंबी दर, मेडिकल टूरिझम याबरोबरीने दारुसाठी बक्कळ पैसे मोजावे लागत आहेत. नियमानुसार गुजरात ड्राय स्टेट अर्थात या राज्यात दारुच्या खरेदीविक्रीवर बंदी आहे. परवानाधारक व्यक्तींना ठराविक आऊटलेट्समध्ये नियमानुसार दारु विकत घेता येते. प्रत्येक व्यक्तीला किती दारु विकत घेता येईल याचं निर्धारित केलेलं प्रमाणही मर्यादितच आहे. आठवडाभराच्या कालावधीत वाईनच्या तीन बाटल्या, प्रत्येकी ६५० मिलीलीटरच्या बीअरच्या १० बाटल्या आणि प्रत्येकी ७५० मिलीलीटरच्या स्प्राईट इतकंच खरेदी करता येऊ शकतं. तळीरामांसाठी हे रेशनिंग आनंदावर विरजण टाकणारं असल्यामुळे दारुही ब्लॅकमध्ये विकली जात आहे. यासाठी झुंबड उडाली आहे. अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आलेल्या चाहत्यांना ‘बसून’ आनंद घेता यावा यासाठी बेकायदेशीर दारुचे विक्रेतेही तयार झाले आहेत. भारतीय व्हिस्कीची बाटली अन्य राज्यात २००० रुपयांपर्यंत मिळते. अहमदाबादमध्ये याच व्हिस्कीसाठी ८००० रुपये मोजावे लागत आहेत. मागणी प्रचंड असल्याने किंमत वाढता वाढता वाढे होत चालली आहे. २०,००० ते ३०,००० रुपयांनाही दारुविक्री होत असल्याचं चित्र आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan match tickets selling in black martket fans occpying hospitals liquor selling at exorbitant prices psp