India vs Pakistan Semi Final Scenarios: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा प्रबळ दावेदार भारत मानला जात आहे. आत्तापर्यंत टीम इंडिया यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अपराजित राहिली आहे. ७ पैकी ७ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंकेचा ३००हून अधिक धावांनी पराभव करत भारतीय संघानं दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. गुणतालिकेनुसार दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता आहे. मात्र, उरलेल्या दोन जागांसाठी चुरस वाढली असून योग्य समीकरणं जुळली, तर भारत व पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.
गुणतालिकेत सध्या कोण कितव्या स्थानी?
३ नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांचे दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या (८ गुण/३ सामने) तर न्यूझीलंड चौथ्या (८ गुण/२ सामने) स्थानी आहे. सेमी फायनलसाठी तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी या दोन संघांना सर्वाधिक संधी आहे. मात्र, पुढच्या संघांचे उर्वरित सामने आणि नेट रनरेट यामुळे चुरस निर्माण होऊ शकते.
सध्या पाचव्या स्थानी पाकिस्तान (६ गुण/२ सामने) आहे. पाकिस्तानचे पुढचे सामने अनुक्रमे न्यूझीलंड व इंग्लंडशी होणार आहेत. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला आपलं स्थान निश्चित करायचं असेल, तर उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण भारत-पाकिस्तान सेमीफायनल होण्यासाठी एवढं पुरेसं आहे?
कोणता ‘आकडे’योग जुळून यावा लागेल?
भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये आमने-सामने पाहायचे असतील, तर पाकिस्तानला फक्त दोन्ही सामने जिंकून फायदा नसून न्यूझीलंडविरुद्धचा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. आधी बॅटिंग केल्यास ८५ धावांनी किंवा धावांचा पाठलाग केल्यास १५ षटकं शिल्लक ठेवून, अर्थात ३५ षटकांमध्ये लक्ष्य पूर्ण करून पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल. असं झाल्यास, न्यूझीलंडनं त्यांच्या शेवटच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला, तरी पाकिस्तान व न्यूझीलंडचे गुण सारखे होतील, पण नेट रनरेटच्या जोरावर पाकिस्तान न्यूझीलंडच्या वर जाईल.
इतर संघांना कितपत संधी?
खाली अफगाणिस्ताननं (६ गुण/३ सामने) उरलेले तिन्ही सामने जिंकले तरच ते पाकिस्तान व न्यूझीलंडला मागे टाकू शकतील. पण त्यासाठी त्यांना बलाढ्य ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेला नमवावं लागेल. श्रीलंका (४ गुण/२ सामने), नेदरलँड्स (४ गुण/३ सामने), बांगलादेश (२ गुण/२ सामने) व इंग्लंड (२ गुण/३ सामने) या संघांनी उरलेले सर्व सामने जिंकले, तरी त्यामुळे त्यांचा समावेश सेमीफायनलसाठी होण्याची शक्यता दुरापास्तच आहे.
पाकिस्ताननं दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि न्यूझीलंडचा उरलेल्या दोनही सामन्यांमध्ये पराभव झाला, तरी पाकिस्तानचा सेमीफायनमध्ये प्रवेश निश्चित आहे. त्याही स्थितीत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी राहण्याची शक्यता जास्तच आहे. कारण उरलेल्या तीनपैकी दोन सामने जरी ऑस्ट्रेलियानं जिंकले, तरी त्यांच्या खात्यावर १२ गुण अर्थात सेमीफायनलचं तिकीट आणि तिसरं किंवा दुसरं स्थान निश्चित आहे. यात ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा सामना करावा लागेल.
IND vs SL, World Cup 2023: श्रेयस अय्यर झेलबाद होताच अथिया शेट्टी झाली नाराज, VIDEO होतोय व्हायरल
विश्वचषकाचं गणित पथ्यावर!
विश्वचषकाच्या यंदाच्या व्यवस्थेनुसार पहिल्या फेरीतल्या पहिल्या चार संघांपैकी पहिला संघ चौथ्या तर दुसरा संघ तिसऱ्या स्थानावरच्या संघाशी सेमीफायनलमध्ये खेळेल. या गणितानुसार, पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश झाला, तर दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर उभे राहू शकतात.