दिवाळीनंतर केंद्राकडून संमती मिळण्याची शक्यता
पाकिस्तानचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून, दिवाळीनंतर या दौऱ्याला सरकारकडून संमती मिळण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले. या दौऱ्यामध्ये पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत.
बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये सहा दौरे होणे अनिवार्य आहे. या सहामधील चार दौरे पाकिस्तानने आयोजित करायचे आहेत. यामध्ये १४ कसोटी, ३० एकदिवसीय आणि १२ ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात यावे, असे ठरविण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ २०१२-१३ साली भारतीय दौऱ्यावर आला होता. त्यानंतर मात्र दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यात आलेली नाही.
‘‘पाकिस्तानबरोबर खेळण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य आहे. त्यामुळे सरकारशी चर्चा करणे गरजेचे आहे. याबाबत जो काही निर्णय सरकार घेईल त्यानुसार बीसीसीआय पाऊल उचलेल,’’ असे बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सांगितले.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अखेरचा कसोटी सामना ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत दिल्लीला होणार आहे. त्यानंतर थेट जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दौरा हा डिसेंबर महिन्यात होऊ शकतो. आफ्रिकेचा दौरा संपल्यावर आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होण्यापूर्वी जो कालावधी शिल्लक राहतो, त्यामध्ये पाकिस्तानबरोबर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.
‘‘भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, अशी बीसीसीआयची भूमिका आहे. खेळावर राजकारणाने कुरघोडी करू नये, असे आम्हाला वाटते. आमच्याकडे या दौऱ्याबाबत काही पर्याय आहेत. त्यानुसार पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवता येईल किंवा ते शक्य नसल्यास तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येऊ शकते. ज्या
ठिकाणी पाकिस्तानच्या संघाला राजकारण्यांचा विरोध आहे,
तिथे हे सामने खेळवण्यात येणार नाहीत,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader