भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. पाकिस्तानकडून भारतावर होत असलेले अतिरेकी हल्ले पाहता भारत सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या स्पर्धांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेट सामने खेळत नाहीत. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं होतं. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या मते, जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत भारत-पाक क्रिकेट मालिका शक्य नाही.
“जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत भारत-पाक क्रिकेट मालिका शक्य नाही. भारत प्रतिसाद देणार नाही. मोदी प्रचंड नकारात्मक विचार करतात, आणि माझ्या मते आपल्यासकट अनेक भारतीयांनाही याची कल्पना आहे. केवळ एका व्यक्तीमुळे भारत-पाक देशांमधले संबंध बिघडत आहेत. दोन्ही देशांमधली लोकं हे एकमेकांच्या देशात यायला-जायला तयार आहेत. पण मोदींना नेमकं काय हवंय हेच समजत नाहीये.” आफ्रिदी पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेच्या एका सामन्यात उपस्थित पत्रकारांशी बोलत होता.
श्रीलंकेच्या संघावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे आयसीसीने पाकिस्तानवर क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. यानंतर पाकचा संघ युएईतील मैदानात खेळत होता. मात्र पाक क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पाठपुरावा करत पाकमधील क्रिकेटबंदी उठवली. यानंतर बांगलादेश, श्रीलंका या संघांनी पाकमध्ये टी-२० आणि कसोटी मालिकाही खेळली. काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरनेही भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दोन देशांमध्ये व्यापार होऊ शकतो, इतर क्रीडा स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने होऊ शकतात तर क्रिकेट सामने खेळण्यास काय हरकत आहे असा सवाल अख्तरने विचारला होता.