सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पध्रेची उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने गतविजेता भारतीय संघ गुरुवारी यजमान नेपाळशी साखळीमधील अखेरच्या सामन्यात भिडणार आहे. ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दसरथ स्टेडियमवर गुरुवारी होणारी लढत किमान अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे. परंतु भारतीय संघासाठी हे आव्हान निश्चित सोपे नसेल.
भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला १-० अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धची लढत बरोबरीत सुटली होती. या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाला आपले विजेतेपद राखणे कठीण जाणार आहे.
सध्या तरी ‘अ’ गटातील चारही संघांना उपांत्य फेरी गाठण्याची समान संधी आहे. नेपाळ आणि भारत यांच्या खात्यावर चार गुण जमा आहेत, तर +२ आणि +१ असा अनुक्रमे गोलफरक आहे. याचप्रमाणे पाकिस्तान (-१) आणि बांगलादेशच्या (-२) खात्यावर प्रत्येकी एकेक गुण जमा आहे.
भारताने नेपाळविरुद्धचा सामना गमावला तरी त्यांना उपांत्य फेरी गाठता येऊ शकते. परंतु त्यासाठी पाकिस्तानने बांगलादेशला हरवणे आवश्यक ठरणार आहे.

Story img Loader