पुढील वर्षी मुंबईत होणारा महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यजमान भारताचा पहिला मुकाबला तगडय़ा वेस्ट इंडिजशी होणार आहे. आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) ३१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या सविस्तर कार्यक्रमाची घोषणा केली.  
गतविजेत्या इंग्लंडची विश्वचषक मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या लढतीने होणार आहे. महिला क्रिकेटविश्वातील भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे अव्वल आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. २००९ महिला विश्वचषकात शेवटच्या चार संघांमध्ये असणारे भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ २०१३ विश्वचषकासाठी पात्र ठरले.  अन्य चार संघांनी बांगलादेशमध्ये झालेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेद्वारे विश्वचषकासाठी स्थान पक्के केले.
आठ संघ दोन गटात चार-चार असे विभागले गेले असून, गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स गटात आगेकूच करतील. वानखेडे स्टेडियम, बांद्रे-कुर्ला संकुल मैदान, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, मिडल इन्कम ग्रुप मैदान आणि डीवाय पाटील स्टेडियम, नेरुळ या पाच ठिकाणी विश्वचषाकाचे एकूण २५ सामने होणार आहेत. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामना १७ फेब्रुवारीला होणार आहे.  आयसीसीचे अधिकृत प्रक्षेपण वाहिनी स्टार क्रिकेट स्पर्धेच्या २५ पैकी १० सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणार आहे. भारतात तिसऱ्यांदा महिला विश्वचषकाचे आयोजन होत आहे.  विश्वचषक महिला क्रिकेटला चालना देणारा असेल असे उद्गार आयसीसीचे अध्यक्ष अ‍ॅलन इसाक यांनी काढले.     

भारताचे सामने
३१ जानेवारी वि. वेस्ट इंडिज- वानखेडे-दिवस/रात्र सामना
४ फेब्रुवारी वि. इंग्लंड- वानखेडे-
६ फेब्रुवारी वि. श्रीलंका- वानखेडे

गट अ  
इंग्लंड, भारत,
वेस्ट इंडिज, श्रीलंका
गट ब
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका

Story img Loader