IND vs ENG 2nd ODI Updates in Marathi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. या सामन्यात टीम इंडियाने २०२१ मध्ये प्रथमच एकदिवसीय संघात समावेश केलेल्या खेळाडूला आता पदार्पणाची संधी दिली आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून सलग दुसऱ्यांदा इंग्लंडने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२१ मध्ये भारतीय संघात नाव येऊनही भारताच्या या फिरकीपटूला वनडे संघात पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. पण आता २०२५ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीला मोठ्या प्रतिक्षेनंतर पदार्पणाची संधी मिळाली. कटकमधील वनडे सामन्यासाठी वरुण चक्रवर्तीचा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वरुण चक्रवर्तीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आहे. यापूर्वी २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यात भारताच्या वनडे संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्या दौऱ्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
२०२१ नंतर वरूणला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याचे नाव सुरुवातीच्या संघात नव्हते. पण मालिकेच्या २ दिवस आधी त्याची संघात निवड झाली आणि आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
वरुण चक्रवर्ती हा इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने ५ सामन्यात १४ विकेट घेतले. हा भारताकडून टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही आहे. याआधीही हा विक्रम वरुण चक्रवर्तीच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने १२ विकेट घेतल्या होत्या. IPL 2024 नंतर वरुण चक्रवर्तीने भारताच्या टी-२० मध्ये पुनरागमन केले. याआधी त्याने २०२१ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत दुखापतीतून सावरत विराट कोहली प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे. विराट कोहली यशस्वी जैस्वालच्या जागी संघात आला आहे. तर कुलदीप यादवला विश्रांती दिली असून वरूण चक्रवर्ती भारताच्या वनडे संघात पदार्पण केले आहे. सर रवींद्र जडेजाने त्याला डेब्यू कॅप दिली.
भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड: फिल सॉल्ट, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टन, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.