जोहान्सबर्गमधील वाँडर्सच्या मैदानामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे. सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे.
सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉिक्सग डे’ कसोटीत भारताने पावसामुळे एक दिवस वाया जाऊनही ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९२ पासून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जात आहे; परंतु त्यांना एकदाही तेथे कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कमकुवत आफ्रिकेविरुद्ध ही संधी गमावणार नाही, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.
वाँडर्स येथील कसोटी भारताने जिंकली, तर सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी येईल. मात्र भारत ही कसोटी जिंकणार की नाही हे पुढील पाच दिवसांमध्ये स्पष्ट होईल तरी भारतासमोरील आव्हान सोपं असणार नाही. त्यामुळेच अचूक संघ निवड महत्वाची ठरणार आहे. भारताची मागील सामन्यातील विजयी संघाची घडी तोडून नव्याने एखादा खेळाडू संघात येणार की पहिल्या सामन्यात खेळलेले खेळाडूच हा सामना खेळणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र यावरुनच भारताचा संभाव्य ११ खेळाडूंचा संघ काय असेल याबद्दल चर्चा सुरु झालीय.
नक्की वाचा >> IND vs SA 2nd Test: विराट विक्रमापासून कोहली सात धावा दूर; द्रविड सरांचा विक्रम मोडण्याचीही सुवर्णसंधी
फंलदाजीसाठी उत्तम कोण?
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलवर भारताच्या फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त आहे. उपकर्णधार राहुलने पहिल्या कसोटीत दमदार शतकी खेळी साकारली. सलामीवीर मयांक अगरवालही उत्तम लयीत असून अजिंक्य रहाणेला सूर गवसल्याचे दिसून आले. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतसुद्धा मुंबईकर श्रेयस अय्यर अथवा हनुमा विहारी यांपैकी एकाला संधी मिळणे कठीण दिसते. ऋषभ पंत यष्टिरक्षणासह उपयुक्त फटकेबाजी करण्यात पटाईत आहे.
उमेशसाठी शार्दूलला डच्चू?
वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक असून येथे चेंडू बऱ्यापैकी स्विंग होईल. अशा स्थितीत चौथा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवला खेळवायचे झाल्यास शार्दूल ठाकूरला संघाबाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे तिघे भारताच्या प्रथम पसंतीचे वेगवान गोलंदाज असतील. शमीने सेंच्युरिअन येथे २०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. तर बुमरा आणि सिराज यांनीही प्रभावी गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीत भारताच्या षटकांच्या संथ गतीचा फटका बसला. त्यामुळे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यावेळी अधिक षटके टाकताना दिसू शकतो. प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मदतीने विराट अंतिम संघ निवडेल असं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> IND vs SA Test: १५ वर्षांची प्रतिक्षा संपणार; अल्लाहुद्दीन पालेकर वयाच्या ४४ व्या वर्षी कसोटीत करणार पदार्पण
आफ्रिकेला डीकॉकची उणीव भासणार
एकीकडे भारतीय संघांमध्ये मोठे बदल दिसून येण्याची शक्यता कमी असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये मोठे बदल दिसून येतील असं म्हटलं जातंय. डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील आफ्रिका संघाला यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉकची उणीव प्रकर्षांने जाणवेल. काही दिवसांपूर्वीच डीकॉकने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या अनुपस्थितीत एल्गर, तेम्बा बव्हुमा यांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. गोलंदाजीत आफ्रिकेकडे कॅगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी असे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र दोन्ही डावांत भारताचे २० बळी मिळवण्यासाठी आफ्रिकेला कडवा संघर्ष करावा लागेल, हे पहिल्या कसोटीद्वारेच स्पष्ट झाले.
कसा असू शकतो दुसऱ्या कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ?
विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, शार्दूल ठाकूर.
कसा असू शकतो दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ?
डीन एल्गर (कर्णधार), तेम्बा बव्हुमा (उपकर्णधार), एडिन मार्करम, कॅगिसो रबाडा, कीगन पीटरसन, ऱ्हासी व्हॅन डर डुसेन, कायले व्हेरायन (यष्टीरक्षक), विआन मुल्डर, दुआन ओलिव्हर, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन.