आगामी विश्वचषकात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करायला हवी, कारण त्याच्यावरच भारतीय संघाची भिस्त असेल, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘कोहलीने या विश्वचषकात चांगली फलंदाजी करायला हवी, कारण धावगती वाढवण्यासाठी तो एक महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यामुळेच भारतीय संघ कोहलीच्या कामगिरीवर अवलंबून असेल. कोहलीने जर चांगल्या फलंदाजीचा नमुना पेश केला तर सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी यांना सामना जिंकवून द्यायला सोपे जाईल,’’ असे द्रविड म्हणाला.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहावे, असे द्रविडला वाटते. याबद्दल द्रविड म्हणाला की, ‘‘धोनीने कसोटीपेक्षा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे तो एकदिवसीय क्रिकेटवर कसोटी निवृत्तीनंतर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल. एकदिवसीय क्रिकेट धोनीला अधिक चांगले पथ्यावर पडत असून तो या क्रिकेटसाठी योग्य आहे.’’
भारताची गोलंदाजी तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत चांगली होत नसली तरी त्याला जास्त चिंता करण्यासारखी ही बाब नाही, असे द्रविडला वाटते. याबाबत तो म्हणाला की, ‘‘भारतीय संघातील युवा गोलंदाज गुणवान आहेत. मोहम्मद शमी फॉर्मात असला तरी अखेरच्या षटकांमधला तो हुकमी एक्का ठरू शकतो. शमी सातत्याने ‘यॉर्कर’ टाकू शकतो, त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असेल. इशांत शर्माकडे चांगला अनुभव आहे. भुवनेश्वर कुमार हा बुद्धिमान गोलंदाज आहे, त्याला चेंडू स्विंग करण्याची कला अवगत आहे. उमेश यादवकडे चांगला वेग आहे. त्यामुळे भारताने गोलंदाजीची जास्त चिंता करण्याचे कारण नक्कीच नाही.’’
भारताच्या फलंदाजीविषयी द्रविड म्हणाला की, ‘‘भारताच्या पहिल्या सात फलंदाजांमध्ये तीन डावखुरे फलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजीचे योग्य समीकरण जुळून आले आहे. उजव्या आणि डाव्या फलंदाजांच्या समन्वयामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण येऊ शकते.’’

Story img Loader