नवी दिल्ली : कोलकाता येथे ४ डिसेंबरला होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत ट्वेन्टी—२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल—१२ फेरीत गारद होणाऱ्या भारताच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत २४ मुद्दय़ांचा विषयपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी परिषद भारताच्या कामगिरीबाबत कसा विचार करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विराट कोहलीच्या एकदिवसीय प्रकाराच्या कर्णधारपदाचे भवितव्यसुद्धा चर्चेत येऊ शकते. राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर साहाय्यक प्रशिक्षक म्हणून पारस म्हांब्रे, टी. दिलीप आणि विक्रम राठोड यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

कार्यकारी परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे; परंतु ही निवडणूक बिनविरोध पार पडेल, असे म्हटले जात आहे. आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकांसाठी गांगुली आणि शाह यांनाच ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करता येईल, या निर्णयावरही बैठकीत शिक्कामोर्बत होईल.

निवड समिती सदस्यांच्या कार्यकाळात वाढ?

‘बीसीसीआय’कडून निवड समिती सदस्यांना चार वर्षांंचा कार्यकाळ दिला जातो; परंतु पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांनंतर आढावा घेऊन त्यांच्या कार्यकाळात वाढ केली जाते. मागील दशकात तीन सदस्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता.

Story img Loader