India scored 445 runs in the first innings of the third Test match against England : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टीम इंडियाने रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
भारताकडून रवींद्र जडेजाने १२२ आणि कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची खेळी केली. याशिवाय सर्फराज खानने ६२ धावांचे, ध्रुव जुरेलने ४६ धावांचे आणि रविचंद्रन अश्विनने ३७ धावांचे योगदान दिले. शेवटी जसप्रीत बुमराहने २८ चेंडूत २६ धावांची खेळी केली. बुमराहने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. इंग्लंडकडून मार्क वुडने चार आणि रेहान अहमदने दोन विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला ३३१ धावांवर सहावा धक्का बसला. कुलदीप यादव ४ धावा करून जिमी अँडरसनचा बळी ठरला. यानंतर रवींद्र जडेजाला जो रूटने बाद केले. जडेजाने २२५ चेंडूत ११२ धावांची खेळी खेळली. यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ध्रुव जुरेल १०४ चेंडूत ४६ धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवी अश्विन ३७ धावा करून रेहान अहमदचा बळी ठरला. जसप्रीत बुमराहने २६ धावांचे उपयुक्त योगदान दिले.
हेही वाचा – WTC Points Table : न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवत पटकावले अव्वल स्थान, भारताला बसला फटका
पहिल्या दिवशी रोहित शर्मानंतर सर्फराज चमकला –
याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. भारतीय कर्णधाराने १९६ चेंडूत १३१ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचवेळी सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीत ६२ धावांची संस्मरणीय खेळी केली.