ट्वेन्टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ३-० असा दणदणीत विजय
भारताने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सात विकेट्स राखून यजमान ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांचे लक्ष्य असूनही युवराज सिंगने पहिल्या दोन चेंडूंत अनुक्रमे चौकार व षटकार लगावून सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मात्र, चिवट वृत्ती असलेल्या ऑस्ट्रेलियाने अखेपर्यंत संघर्ष केला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता असताना रैनाने पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवून चौकार लगावला आणि भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रचलेल्या मजबूत पायावर सुरेश रैनाने टोलेजंग फटकेबाजी करून विजयी कळस चढवला. ऑस्ट्रेलिया त्यांच्या मायभूमीत कोणत्याही प्रकारात तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्याची १४० वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे.
एकदिवसीय मालिकेत लाजिरवाण्या पराभवानंतर नव्या दमाने मैदानात उतरलेल्या भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली होती. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून आपली इभ्रत वाचवण्याचे आव्हान यजमानांसमोर होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाला १६ धावांवर पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजाला अनुभवी गोलंदाज आशीष नेहराने कर्णधार महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद करून माघारी धाडले. त्यापाठोपाठ शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाही अनुक्रमे आर. अश्विन व युवराज सिंग यांनी स्वस्तात बाद करून ऑस्ट्रेलियासमोरील अडचणी वाढवल्या; परंतु कर्णधार वॉटसनने फटकेबाजी करत संघाच्या धावांचा वेग वाढता ठेवला. मार्शसह दुसऱ्या विकेटसाठी जोडलेल्या ५३ धावांच्या भागीदारीमध्ये वॉटसनच्या ४१ धावांचा समावेश होता. त्यानंतर ट्रॅव्हीस हेडसह चौथ्या विकेटसाठी वॉटसनने ९३ धावांची भागीदारी केली. या जोडीने ७.५ षटकांत ११.८७च्या सरासरीने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. वॉटसनने ७१ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करून १२४ धावांची खेळी केली. वॉटसनच्या याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १९७ धावांचा डोंगर उभा केला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियावर पहिल्या षटकापासून प्रहार करण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तीन षटकांत ४६ धावा चोपल्या. मात्र, चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूंवर वॉटसनने धवनला माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सातत्यपूर्ण खेळाचा नजराणा पुन्हा पेश केला. विराट व रोहितच्या दुसऱ्या विकेटसाठीच्या ७८ धावांच्या भागीदारीने भारताला विजयपथावर आणले. रोहितने ३८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार लगावून ५२ धावा केल्या, तर विराटने ३६ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. यामध्ये दोन चौकार व एका षटकाराचा समावेश होता. खेळपट्टीवर नांगर टाकून बसलेल्या या फलंदाजांना कॅमेरून बोयसने एकामागोमाग बाद करून भारताला अडचणीत टाकले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत २५ चेंडूंत ४९ धावांची नाबाद खेळी केली. त्यामध्ये ६ चौकार व एक षटकाराचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगने मात्र निर्धाव चेंडू खेळून सामन्यात काही काळासाठी तणाव निर्माण केला होता. अखेरच्या षटकात त्यानेच यातून मार्ग काढला. अॅण्ड्रय़ू टायच्या पहिल्या दोन चेंडूंवर युवराजने चौकार व षटकार लगावून धाव आणि चेंडूंतील अंतर कमी केले. रैनाने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावून भारताचा ३-० असा निर्भेळ विजय पक्का केला.
ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारत अव्वल
ऑस्ट्रेलियाची शुभ्र धुलाई करून भारताने आयसीसी ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. भारताच्या खात्यात १२० गुण असून वेस्ट इंडिज ११८ गुणांसह दुसऱ्या, तर श्रीलंकाही समान गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारत कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानावर, तर एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५ बाद १९७ (शेन वॉटसन १२४, ट्रॅव्हिस हेड २६; आशीष नेहरा १-३२, जसप्रीत बुमराह १-४३, आर. अश्विन १-३६, युवराज सिंग १-१९) पराभूत वि. भारत : ३ बाद २०० (रोहित शर्मा ५२, शिखर धवन २६, विराट कोहली ५०, सुरेश रैना नाबाद ४९, युवराज सिंग नाबाद १५; शेन वॉटसन १-३०, कॅमेरून बोयस २-२८).
सामनावीर : शेन वॉटसन, मालिकावीर: विराट कोहली.