पीटीआय, नॉर्थ साऊंड (अँटिगा)

भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल आठ’ फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात शनिवारी बांगलादेशचा सामना करेल. या सामन्यात भारताच्या शीर्ष फळीतील फलंदाजांकडून चमकदार कामगिरी अपेक्षित असेल.

दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी पाहिल्यास भारतीय संघाचे पारडे जड दिसते. मात्र, बांगलादेश संघाची क्षमता पाहता त्यांना हलक्याने घेण्याची चूक भारत करणार नाही. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाने ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाला पराभूत करत चांगली सुरुवात केली होती. वेस्ट इंडिजमध्ये भारताचे एकमेव लक्ष्य हे जेतेपद मिळवण्याचे आहे. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकेल. यानंतर २४ जूनला भारताची गाठ ऑस्ट्रेलियन संघाशी पडणार आहे.

हेही वाचा >>>हा माणूस आहे का चित्ता? मार्नस लबूशेनचा अचंबित करणारा कॅच, VIDEO होतोय व्हायरल

पंत, सूर्यकुमारवर भिस्त

अफगाणिस्तानविरुद्ध भारताने विजय मिळवला असला, तरीही कर्णधार रोहित शर्माला तारांकित खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित असेल. विराट कोहली व रोहितने चांगली सुरुवात केली, मात्र त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. डावखुरा फलंदाज शिवम दुबेला मधल्या व अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात नाबाद ३१ धावांची खेळी केली. मात्र, सूर्यकुमार यादवच्या प्रयत्नांमध्ये भारताला विजय मिळाला.

रहमान, दासकडे नजर

बांगलादेशला पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे या सामन्यात त्यांच्यासाठी विजय हा अनिवार्य आहे. बांगलादेशच्या फलंदाजांनी आतापर्यंत निराश केले आहे. भारताविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागणार आहे. सलामीवीर लिटन दास व तंजिद हसन यांच्या खराब कामगिरीमुळे संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ‘‘शीर्ष फळीने धावा करणे गरजेचे आहे. भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीचा आमचा प्रयत्न राहील,’’ असे बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने सांगितले.