फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही चांगली सुरुवात होऊनही भारताला पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, तर दुसरीकडे चांगली सुरुवात न होतासुद्धा पाकिस्तानने सामना जिंकला, यामागचे गुपित म्हणजे दडपण हाताळण्याची पद्धत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोणताही असो, प्रत्येक क्षणागणिक दडपण वाढतच जाते, श्वास रोखले जातात, कधी कधी जिवावरही बेतते, कारण हे दोन देश जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा मैदानाचे रूपांतर रणांगणात होते आणि कर्णधाराचे सेनापतीमध्ये, प्रत्येक सामना हे युद्ध ठरते, या दौऱ्यातले दुसरे युद्ध शुक्रवारी रंगणार आहे ते इथल्या मोटेरा स्टेडियमवर. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला मायदेशात लाज वाचवण्यासाठी हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवणे भाग आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने हा सामना जिंकल्यास त्यांना मालिका खिशात टाकता येईल. दोन्हीही संघांत दर्जेदार गुणवत्ता असली तरी जो संघ चांगल्या पद्धतीने दडपण हाताळेल तोच संघ सामना जिंकू शकेल.
फलंदाजीमध्ये अजिंक्य रहाणे आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण मधली फळी पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे नतमस्तक झाल्यामुळे भारताला १३३ धावाच करता आल्या. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी पहिल्या सामन्यात अपेक्षाभंग केला होता, त्यामुळे या सामन्यात त्यांना चांगली कामगिरी करून लौकिक कायम ठेवावा लागेल. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार हा एक गुणी वेगवान गोलंदाज गेल्या सामन्यात आपल्याला सापडला, या यशानंतरही तो जमिनीवर पाय ठेवून कामगिरी करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. बाकी गोलंदाजीमध्ये आनंदी-आनंदच आहे. युवराज हा गोलंदाजीमध्ये धोनीचा एकमेव आधार होता, पण गेल्या सामन्यात त्याचाही समाचार पाकिस्तानच्या फलंदाजांनी घेतल्याने गोलंदाजांचा मोठा पेच धोनीपुढे असेल.
गोलंदाजी हा भारताचा कच्चा दुवा असला तरी पाकिस्तानचे ते बलस्थान आहे. उमर गुल आणि सोहेल तन्वीर यांनी अप्रतिम वेगवान गोलंदाजीचा नमुना पहिल्या सामन्यात पेश केला होता. तर फिरकीपटू सईद अजमलनेही त्याच्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना हतबल करून सोडले होते. शाहीद आफ्रिदीची मात्र गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही चमक दिसली नाही. फलंदाजीमध्ये नसीर जमशेद आणि अहमद शेहझाद यांना आपली छाप पाडता आलेली नाही, तर उमर आणि कामरान या अकमल बंधूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार मोहम्मद हाफीझ आणि शोएब मलिक हे दोघेही चांगल्या फॉर्मात असून त्यांनी पहिला सामना झुंजार अर्धशतकी खेळी साकारून जिंकवून दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा संघाला असेल.
दोन्ही संघांमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण हा एकमेव समान दुवा आहे. दोन्ही संघाचे क्षेत्ररक्षण अजूनही सुधारलेले नाही. मोटेराची खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याने दोन्ही संघात काही बदल नक्कीच होतील, पण दडपण व्यवस्थित हाताळून जो संघ खेळेल तोच विजयी ठरेल.    
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराज सिंग, अंबाती रायुडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक दिंडा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, परविंदर अवाना.
पाकिस्तान : मोहम्मद हाफीझ (कर्णधार), नसीर जमशेद, कामरान अकमल (यष्टीरक्षक), उमर अकमल, उमर अमीन, शोएब मलिक, शाहीद आफ्रिदी, सईद अजमल, मोहम्मद इरफान, जुनैद खान, सोहेल तन्वीर, उमर गुल, असद अली, झुल्फिकार बाबर आणि अहमद शेहझाद.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्टार क्रिकेट
वेळ : सायंकाळी ५ वाजल्यापासून.

Story img Loader