आशियाई क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी फारसा चांगला गेला नाही. १० मी. एअर पिस्तूल प्रकारात भारतीय पुरुषांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बॅडमिंटनमध्ये महिलांना उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांनी पदके निश्चित केली आहेत. हॉकीमध्ये भारतीय पुरुषांनी श्रीलंकेचा ८-० असा धुव्वा उडवला, तर पुरुषांनी टेनिसमध्ये नेपाळला ३-० असे निष्प्रभ केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नेमबाजांनी दुसऱ्या दिवशीही चांगला खेळ करत पदकाला गवसणी घातली. जितू राय, प्रकाश नानजप्पा आणि समरेश जंग या त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले. १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात जितूला पदकाने हुलकावणी दिली. त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अचूक कौशल्यासह खेळणाऱ्या जितूने ५८५ गुणांची कमाई केली. अनुभवी समरेश जंगने ५८० तर प्रकाश नानजप्पाने ५७८ गुण मिळवले. या तिघांचे मिळून भारताचे १७४३ गुण झाले. भारत आणि चीन यांच्या गुणांची बरोबरी झाल्याने अचूक लक्ष्यभेदाच्या निकषानुसार कांस्यपदकाचा फैसला करण्यात आला. यामध्ये चीनच्या नावावर ६५ लक्ष्यवेध तर भारताच्या नावावर ६४ लक्ष्यवेध होते. निसटत्या फरकाने चीनला रौप्य तर भारताला कांस्यपदकावर मिळाले. १७४४ गुणांसह यजमान दक्षिण कोरियाने सुवर्णपदकावर कब्जा केला.
जितूने ९७, ९९, ९५, ९८, ९७, ९९ अशा पद्धतीने लक्ष्यभेद केला तर समरेशने ९७, ९७, ९७, ९६, ९६, ९८ अशा पद्धतीने लक्ष्यभेद करूनही भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता प्रकाश नानजप्पा पायाला दुखापत झालेली असतानाही सहभागी झाला. हॅनोव्हर, जर्मनी येथे व्यायाम करत असताना प्रकाशच्या पायाला लागले होते. कांस्यपदक विजेती श्वेता चौधरीप्रमाणे प्रकाशलाही आपल्या मूळ पिस्तूलाने खेळता आले नाही. सीमाशुल्क विभागाने रोखून धरल्याने स्पर्धेपूर्वी निर्धारित वेळेत प्रकाशला मूळ पिस्तूल मिळू शकले नाही.
वैयक्तिक प्रकारात जितूने चांगली सुरुवात केली. दहाव्या लक्ष्यभेदानंतर त्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. मात्र अकरावा प्रयत्न लक्ष्यापासून फारच दूर गेल्याने जितूच्या पदकाच्या आशा मावळल्या. १४व्या प्रयत्नानंतर पदकाच्या शर्यतीतून तो बाहेर फेकला गेला.
ट्रॅप नेमबाजपटूंकडून निराशा
मनशेर सिंग, मानवजीत सिंग संधू आणि क्यानन चेनाई या त्रिकुटाला सांघिक ट्रॅप प्रकारात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनशेरने ११७, मानवजीतने ११६ तर चेनाईने १०८ गुण मिळवले. वैयक्तिक प्रकारात या तिघांनाही अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही.
उपांत्य फेरीत महिला संघ पराभूत
बॅडमिंटन
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाने २८ वर्षांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकाची कमाई केली. कोरियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवत पदकाचा रंग बदलण्याची भारतीय संघाला संधी होती मात्र कोरियाने भारतावर ३-० विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. सायना नेहवालने स्युंग जिह्य़ुनावर २१-१२, १०-२१, २१-९ असा विजय मिळवला. ७९ मिनिटांच्या लढतीत बेइ येआँज्युने सिंधूवर २१-१४, १८-२१, २१-१३ अशी मात केली. किम सोयुंग आणि चांग येना जोडीने प्रज्ञा गद्रे-सिक्की रेड्डी जोडीला २१-१६, २१-१७ असे नमवले. किम ह्य़ोमिनने पी. सी. तुलसीचा २१-१२, २१-१८ असा धुव्वा उडवत कोरियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दीपिका, घोषाल यांचे पदक पक्के
स्क्वॉश
आशियाई स्पर्धेत पदकांची हमी देणाऱ्या सौरव घोषालने यंदाही स्क्वॉशच्या पुरुष एकेरी विभागात आपले पदक निश्चित केले आहे, तर दुसरीकडे स्पर्धेतील ‘ड्रॉ’च्या दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या भारतीय महिला खेळाडूंपैकी दीपिका पल्लीकलने जोश्ना चिनप्पावर मात करत पदक निश्चित केले आहे. १९९८ साली स्क्वॉश आशियाई स्पर्धेत खेळण्यास सुरुवात झाली. भारताने आतापर्यंत चार कांस्यपदके पटकावली असून त्यापैकी दोन घोषालच्या नावावर आहेत. उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित घोषालने पाकिस्तानच्या इक्बाल नसीरवर ११-६, ९-११, ११-२, ११-९ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीमध्ये दीपिकाने जोश्नाचा ७-११, ११-९, ११-८, १५-१७, ११-९ असा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा