भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहीत शर्मा यांनी आणखी जास्त जबाबदारीने खेळायला हवे होते असे म्हणत संघाच्या फलंदाजाची सुरुवात चांगली झाली असती, तर सामन्याचे चित्र वेगळे असते त्यामुळे संयमी फलंदाजी करा असा सल्ला कर्णधार धोनीने धवन-रोहीतला दिला आहे.
धोनी म्हणाला,”संघाच्या सलामीफलंदाजांवर बोलायचे झाले, तर त्यांनी पहिल्या दहा षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली होती परंतु, त्यांनी आणखी दहा-पंधरा षटके थांबून खेळले पाहिजे होते. त्यानुसार आम्ही २२व्या किंव्या २५व्या षटकापासून फटकेबाजीला सुरूवात केली असती. पण, असो प्रत्येकवेळी तुम्ही आखलेल्या योजनेप्रमाणेच होते असे नाही. पुढील सामन्यात याचा आम्ही नक्की विचार करू.” असेही धोनी म्हणाला.
न्यूझीलंडविरुद्धच्या या दुसऱया एकदिवसीय सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४२ षटकांचा खेळविण्यात आला होता. यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २७१ धावा ठोकल्या परंतु, डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारतासमोर विजयासाठी ४२ षटकांत २९७ धावांचे आव्हान होते. याचा पाठलाग करताना भारताचा अवघ्या १५ धावांनी पराभव झाला. 
भारताला काही बदल करावे लागतील -धोनी
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सकारात्मक वाटचाल करण्याच्या इराद्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारताला काही बदल करावे लागतील, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १५ धावांनी पराभव पत्करल्यामुळे भारताने एकदिवसीय क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले आहे.‘‘भारताला काही बदल करून आता क्रिकेट खेळावे लागेल. जे फार महत्त्वाचे ठरेल. न्यूझीलंड दौऱ्यावर काही गोष्टी आमच्या विरोधात गेल्या,’’ असे धोनीने सांगितले.

 

Story img Loader