ICC Test Team Rankings India Update: भारतासाठी कसोटी क्रिकेट सीझन फार काही चांगला ठरला नाही. इंग्लंडविरूद्ध ४-१ अशा मोठ्या विजयाने कसोटी मालिकेची सुरूवात करत भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३-१ अशा पराभवाने याची सांगता करावी लागली आहे. यासह भारताला आता कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. जिथे भारताला मालिका पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे पाकिस्तानचा संघही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ज्यात आफ्रिकेने पाकिस्तानवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे. ज्याचा भारताला क्रमवारीत फटका बसला.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह पाकिस्तानचा संघही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता, या दोन्ही मालिकांच्या निकालाचा भारताच्या कसोटी क्रमवारीवर परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडिया क्रमवारीत खाली घसरली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघ दीर्घकाळापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत वर्चस्व गाजवत आहे, मात्र सततच्या पराभवांमुळे टीम इंडियाची क्रमवारी घसरली आहे. टीम इंडिया आता १०९ रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आली आहे.
हेही वाचा – “पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर होती. मालिका संपल्यानंतरही टीम इंडिया दुसऱ्या स्थानावरच कायम होती. पण दक्षिण आफ्रिकेने आता भारतीय संघाला धक्का दिला असून आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरूद्ध २-० अशा निर्भेळ मालिका विजयासह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करताच त्यांचे रेटिंग पॉइंट भारतापेक्षा चांगले झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ११२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ज्यांचे १२६ गुण गुण आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला केवळ क्रमवारीतच फटका बसला नाही. तर, भारतीय संघही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा अंतिम सामना ११ जूनपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. भारत २०२१ आणि २०२३ मध्ये अंतिम फेरी खेळला होता, जिथे न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला. पण भारताची सध्याची कसोटी कामगिरी पाहता भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये मागे पडत असल्याचे अनेक माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.