काही गोष्टी पाचवीला पुजलेल्याच असतात आणि काही झालं तरी त्या गोष्टी पिच्छा काही करून सोडत नाही. एका परंपरेसारखी ती गोष्ट होतच राहते, तीच गोष्ट भारतीय संघाचा बाबतीत शुक्रवारीही घडली. भारताच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना लोळण घालायला लावले खरे, पण पुन्हा एकदा शेपटाने भारताला तंगवले. हत्ती गेलं पण शेपूट राहिलं, ही म्हण भारतीय संघाला बऱ्याचदा अनुभवायला मिळते. ऑस्ट्रेलियाची ७ बाद १३६ अशी दयनीय अवस्था असताना भारतीय संघ पहिल्याच दिवशी फलंदाजीला येण्याची स्वप्ने पाहत होता, पण स्टिव्हन स्मिथ आणि पीटर सिडल या तळाच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारताचे स्वप्न धुळीस मिळवले. या दोघांच्या संयत फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ८ बाद २३१ अशी मजल मारली आहे. ‘ऑफ-स्पिनर’ आर. अश्विनने चार बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार शेन वॉटसनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण पाचव्याच षटकांत त्यांना डेव्हिड वॉर्नरच्या (०) रूपात पहिला धक्का बसला. त्यानंतर एड कोवन (३८) आणि फिलिप ह्य़ुज (४५) यांनी संघाला स्थैर्य मिळवून देत दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. ही जोडी संघाला मोठी धावसंख्या उभारून देणार असे वाटत असताना उपाहाराच्या सात षटकांपूर्वी ह्य़ुजचा इशांत शर्माने त्रिफळा उद्ध्वस्त करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. उपाहारानंतर एक बाजू लावून धरणाऱ्या कोवनचा अप्रतिम त्रिफळा अश्विनने भेदला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळायला सुरुवात झाली. २ बाद १०६ वरून अवघ्या ३० धावांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाच बळी गमावले. ७ बाद १३६ अशी अवस्था असताना भारत ऑस्ट्रेलियाला दोनशे धावांच्या आत गुंडाळेल, असे वाटत होते. पण त्यावेळी एक बाजू खंबीरपणे लावून धरणाऱ्या स्मिथला सिडलने चांगली साथ देत फिरकीचा उत्तम रीतीने सामना केला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताला विजयापासून दूर केले. स्मिथ अर्धशतकाची वेस ओलांडणार असे वाटत असतानाच अश्विनने त्याचा काटा काढला. स्मिथने बाद होण्यापूर्वी ३ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली. स्मिथ बाद झाल्यावर तरी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव भारतीय गोलंदाज लवकर गुंडाळतील असे वाटत असले तरी सिडलने जेम्स पॅटीन्सनच्या (खेळत आहे ११) साथीने पहिला दिवस खेळून काढण्याची जबाबदारी चोख पार पाडली. सिडलने यावेळी ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४७ धावांची खेळी साकारत संघावरचे संकट दूर सारले. त्याने पॅटीन्सनच्या साथीने नवव्या विकेटसाठी ४२ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
इशांत शर्माने पहिल्या दोन्ही फलंदाजांना बाद करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण पहिल्या सत्रात त्याचा अपवादवगळता एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. दुसऱ्या सत्रात मात्र आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भेदक मारा करत पाच बळी मिळवले, तर तिसऱ्या सत्रात स्मिथला बाद केल्यावर मात्र एकाही गोलंदाजाला बळी मिळवता आला नाही.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : एड कोवन त्रि.गो. अश्विन ३८, डेव्हिड वॉर्नर झे. कोहली गो. शर्मा ०, फिलिप ह्य़ुज त्रि. गो. शर्मा ४५, शेन वॉटसन यष्टीचीत धोनी गो. जडेजा १७, स्टिव्हन स्मिथ झे. रहाणे गो. अश्विन ४६, मॅथ्यू वेड झे. विजय गो. अश्विन २, ग्लेन मॅक्सवेल झे. शर्मा गो. जडेजा १०, मिचेल जॉन्सन त्रि. गो अश्विन ३, पीटर सिडल खेळत आहे ४७, जेम्स पॅटीन्सन खेळत आहे ११, अवांतर (बाइज ५, लेग बाइज ७) १२, एकूण ९८ षटकांत ८ बाद २३१.
बाद क्रम : १-४, २-७१, ३-१०६, ४-११५, ५-११७, ६-१२९, ७-१३६, ८-१८९.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९-१-४३-०, इशांत शर्मा १४-३-३५-२, आर. अश्विन ३०-१७-४०-४, प्रग्यान ओझा २३-६-६७-०, रवींद्र जडेजा २२-६-३४-४.
कोटलाची खेळपट्टी टीकाकारांचे लक्ष्य
नवी दिल्ली : चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दिल्लीतील फिरोझशाह कोटला मैदानावरील खेळपट्टी टीकाकारांचे लक्ष्य ठरली आहे. तिसऱ्या दिवशी जशी खेळपट्टी होते, तशी या खेळपट्टीची कसोटीच्या पहिल्याच दिवशी अवस्था असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सकाळच्या सत्रात ओल्ड क्लब हाऊस टोकाकडून गोलंदाजी करत असताना, काही चेंडू अतिशय खाली राहत होते तर काही टप्प्पा पडल्यानंतर प्रचंड उसळी घेत होते. खेळपट्टीला तडे गेले होते. कोटला खेळपट्टीच्या नेहमीच्या गुणवैशिष्टय़ामुळे या खेळपट्टीवर चेंडू संथपणे बॅटवर येतो आणि जसे दिवस पुढे जातात तसा चेंडू अधिकाअधिक वळतो. या खेळपट्टीवर गोलंदाजी करायला भारतीय फिरकीपटू आतुर असतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. तिसऱ्या दिवशीप्रमाणे खेळपट्टीचे स्वरूप असून, कसोटीच्या पुढच्या दिवसांत या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक असेल, असे भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने समालोचनादरम्यान बोलताना सांगितले. खेळपट्टीच्या अशा स्वरूपामुळे ही कसोटी कदाचित तीन दिवसांतच संपेल अशी शक्यता रवी शास्त्रीने व्यक्त केली. ही खेळपट्टी तिसऱ्या दिवसाप्रमाणे वाटली होती, पण आता ती हळूहळू चांगली होत असल्याचे मत रमीझ राजाने व्यक्त केले. घाईने या खेळपट्टीबाबत निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकते असेही राजाने सांगितले.
अजित तेंडुलकरची उपस्थिती
सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ अजित तेंडुलकरने फिरोझशाह कोटला मैदानावर हजेरी लावली. सचिनची कारकीर्द घडवण्यात अजितची भूमिका निर्णायक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित कसोटीचे सगळे दिवस थांबण्याची शक्यता आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर ४-० असा ऐतिहासिक विजय मिळवल्यास, तो क्षण पाहण्यासाठी अजित पुढील चार दिवस दिल्लीतच राहण्याची शक्यता आहे. सचिनचे मार्गदर्शक, मित्र असलेल्या अजित यांनी पहिल्या दिवसाचा खेळ पाहिला. नेहमीप्रमाणे अजित प्रसिद्धीपासून दूरच होते. खेळ पाहिल्यानंतर ते रवाना झाले. सचिन कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघ या मालिकेनंतर थेट १५ महिन्यांनंतर भारतात कसोटी खेळणार आहे. सचिनची भारतातली ही अंतिम कसोटी असल्याच्या चर्चाना दिवसभरात उधाण आले होते. त्या पाश्र्वभूमीवर अजितची फिरोझशाह कोटलावरची हजेरी सूचक होती.
सचिन भारतातली शेवटची कसोटी खेळला की नाही माहीत नाही -गावस्कर
सचिन तेंडुलकर भारतातली शेवटची कसोटी खेळला आहे की नाही हे सांगू शकत नसल्याचे उद्गार भारताचे ज्येष्ठ खेळाडू सुनील गावस्कर यांनी काढले. २००६-०७ पासून सचिनच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. पण तो तेवढय़ाच सहजतेने खेळत आहे. निवृत्तीबाबत त्यालाच माहिती असेल. चारही कसोटींमध्ये धोनी नाणेफेक हरला. मात्र त्याचे त्याला फारसे वाईट वाटणार नाही. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत सुस्थितीत आहे. आठ विकेट्सच्या मोबदल्यात २३० धावांनी भारताला फारशा त्रासदायक नाहीत. भारतातर्फे मालिकेत फलंदाजी विभागात अधिकार गाजवणाऱ्या पद्धतीने खेळी केल्या आहेत. त्यामुळे चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही.
नियमित कर्णधार मायकेल क्लार्कला झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीसाठी शेन वॉटनसकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याची भावना वॉटसनने व्यक्त केली. फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही बाबतीत क्लार्कची उणीव भासेल. परंतु कर्णधारपदाचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज असल्याचे वॉटसनने सांगितले. भारतात परतल्यानंतर मायकेल आणि प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी कर्णधारपदासंदर्भात माझ्याशी चर्चा केली. क्लार्क तंदुरुस्त नसल्यास माझ्याकडे कर्णधारपद सोपवले जाणार होते. यामुळे मानसिकदृष्टय़ा मी कर्णधारपदाची तयारी केल्याचे त्याने पुढे सांगितले. शेवटचा आठवडा माझ्यासाठी प्रचंड चढ-उताराचा होता. कसोटीसाठी निलंबित होणे, माझ्यावर प्रचंड आघात करणारे होते. या स्थितीतून सावरत पुन्हा देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही अनोखी संधी आहे.
शेन वॉटसन, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
ज्याप्रमाणे आम्हाला पहिल्या दिवसाच्या खेळपट्टीची सवय असते, तशी ही खेळपट्टी नाही. खेळपट्टीवर अगदी लगेचच तडे गेले आहेत. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी आणखी कठीण होत जाईल. इशांत शर्माने फिलीप ह्य़ुजेसला टाकलेला चेंडू हे याचे उत्तम उदाहरण होते. चेंडू टप्पा पडल्यानंतर अचानक प्रचंड उसळला आणि थेट ह्य़ुजेसच्या हेल्मेटवर आदळला. कसोटीच्या पहिल्या दिवशी चेंडू एवढा उसळण्याची सवय नाही. त्या चेंडूने आमची भूमिका बदलली. ह्य़ुजेसने सकारात्मक पद्धतीने खेळ केला. पहिल्या दिवसअखेर २३१ ही चांगली धावसंख्या आहे. शनिवारी सकाळी आम्ही ५० धावा वाढवू शकलो तर आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारू. फिरकी गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली. भारतीय फिरकीपटूंनी अचूक मारा केला. क्षेत्ररक्षणाची सजावटही गोलंदाजीला साजेशी होती.
स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू
पहिल्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २३१/८
सत्र षटके धावा/बळी
पहिले सत्र २८ ९४/२
दुसरे सत्र ३९ ५९/५
तिसरे सत्र ३१ ७८/१