पीटीआय, नवी दिल्ली
भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी संघाची घोषणा करताना कोहलीचा समावेश नसणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोहलीच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चा आता संपुष्टात आल्या आहेत. कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांतही सहभाग नोंदवला नव्हता.
‘‘विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे उर्वरित सामन्यांच्या निवडीसाठी उपलब्ध नसेल. ‘बीसीसीआय’ कोहलीच्या या निर्णयाचा आदर करते,’’ असे ‘बीसीसीआय’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कोहली सध्या कौटुंबिक कारणांसाठी विदेशात असल्याचे समजते आहे. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे सुरू होणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे कोहली अनुपलब्ध राहणार असल्याची कल्पना ‘बीसीसीआय’ला होती. मात्र, ७ ते ११ मार्च दरम्यान धरमशाला येथे होणाऱ्या अखेरच्या कसोटीसाठी तो उपलब्ध होईल का याची चाचपणी ‘बीसीसीआय’कडून केली जात होती. पण, त्यांच्या पदरी निराशा आली.
हेही वाचा >>>IND vs ENG Test : उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, दोन दिग्गजांचं पुनरागमन, दुखापतीमुळे श्रेयस संघाबाहेर
उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.