India Squad for 2nd and 3rd IND vs NZ Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बीसीसीआयने या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठीच संघ जाहीर केला होता. आता पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आपल्या संघात बदल केला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.
बीसीसीआयने न्यूझीलंडविरूद्ध उर्वरित दोन कसोटीसाठी संघ जाहीर करताना एक बदल केला. ज्यात वॉशिंग्टन सुंदरचा कसोटी संघात समावेश केला आहे. याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला रिलीज करण्यात आलेले नाही. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघाने आपली फिरकी गोलंदाजी बाजू अधिक मजबूत केली आहे. मालिकेतील दुसरा सामना पुण्यात तर तिसरा सामना मुंबईत होणार आहे. रिपोर्ट्सनुसार पुण्यातील सामना काळ्या मातीत खेळवला जाईल असे मानले जात आहे. जिथे फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, “पुरुष क्रिकेट निवड समितीने रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे. पुणे येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल.”
वॉशिंग्टन सुंदरने भारतासाठी चार कसोटी सामने खेळला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. चार कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ६६.२५ च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. वॉशिंग्टन सुंदर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून खेळत आहे. दिल्लीविरुद्ध त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५२ धावांची खेळी केली. त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक आहे.
न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर
© IE Online Media Services (P) Ltd