India Squad for Border Gavaskar Trophy 2024: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार असून त्यासाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने आज २५ तारखेला केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याचबरोबर संघात ३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दुखापतीतून सावरत असलेला भारताचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी नितीश कुमार रेड्डी याचीही अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. सलामीवीर अभिमन्यू इसवरनला सुद्धा भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याची पोचपावती आहे, असं नक्कीच म्हणता येईल.
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे दोन्ही फिरकीपटू दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. वॉशिंग्टन सुंदरचे संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी पुढील महिन्यात २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेअंतर्गत दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. दुसरा कसोटी सामना ६ ते १० डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाईल आणि त्यानंतर चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळली जाईल. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.
हेही वाचा – Washington Sundar: घरच्यांनी का ठेवलं ‘वॉशिंग्टन’ हे नाव? वॉशिंग्टन सुंदरच्या नावामागची काय आहे नेमकी कहाणी?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक (Border Gavaskar Trophy full schedule)
पहिली कसोटी: २२-२६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: ६-१० डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र)
तिसरी कसोटी: १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: २६-३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: ३-७ जानेवारी, सिडनी
हेही वाचा – IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद