भारताच्या पंत, श्रेयस यांची अर्धशतके; श्रीलंकेपुढे ४४७ धावांचे आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळूरु : भारताच्या ऋषभ पंतला जागतिक क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक का मानले जाते, याचा रविवारी पुन्हा प्रत्यय आला. एम. चिन्नास्वामीच्या अवघड खेळपट्टीवर पंतने (३१ चेंडूंत ५० धावा) फटकेबाज अर्धशतक झळकावले. तसेच श्रेयस अय्यरने (८७ चेंडूंत ६७) दमदार कामगिरी सुरू ठेवल्यामुळे भारताने दुसरा डाव ९ बाद ३०३ धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेपुढे दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी ४४७ धावांचे आव्हान ठेवले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दिवसअखेर १ बाद २८ अशी स्थिती होती. पहिल्या डावात श्रीलंकेचा निम्मा संघ गारद करणाऱ्या जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात लाहिरू थिरीमानेला (०) पायचीत पकडले. मग श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (नाबाद १०) आणि कुशल मेंडिस (नाबाद १६) यांनी संघर्ष केला.   

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी ६ बाद ८६ वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांतच आटोपला. जसप्रीत बुमराने (५/२४) भारतातील कसोटीच्या एका डावात पहिल्यांदाच पाच बळी मिळवले.

त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा (४६), मयांक अगरवाल (२२) आणि हनुमा विहारी (३५) या अव्वल तीन फलंदाजांनी चांगले योगदान दिले. मात्र, कोहली (१३) पुन्हा अपयशी ठरला.  

संक्षिप्त धावफलक

* भारत (पहिला डाव) : २५२

* श्रीलंका (पहिला डाव) : ३५.५ षटकांत सर्वबाद १०९ (अँजेलो मॅथ्यूज ४३; जसप्रीत बुमरा ५/२४, मोहम्मद शमी २/१८)

* भारत (दुसरा डाव) : ६८.५ षटकांत ९ बाद ३०३ डाव घोषित (श्रेयस अय्यर ६७, ऋषभ पंत ५०; प्रवीण जयविक्रमा ४/७८)

* श्रीलंका (दुसरा डाव) : ७ षटकांत १ बाद २८ (मेंडिस नाबाद १६; जसप्रीत बुमरा १/९)

पंतचा अर्धशतकी विक्रम

पंतने दुसऱ्या डावात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ २८ चेंडू घेतले. त्यामुळे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आता पंतच्या नावे झाला आहे. त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव (३०) यांचा विक्रम मोडीत काढला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sri lanka test cricket match
First published on: 14-03-2022 at 03:23 IST