पीटीआय मुंबई
मायदेशात प्रथमच भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करताना विजयी सलामीसाठी हार्दिक पंडय़ा उत्सुक असून मंगळवारी त्याच्या युवा संघापुढे श्रीलंकेचे आव्हान असेल. तीन सामन्यांच्या या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचे युवा खेळाडू या मालिकेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वाचे लक्ष असेल.
या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने भारतीय संघाने सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटला प्राधान्य दिलेले नाही. मात्र, २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने हार्दिकसाठी ही मालिका महत्त्वाची ठरू शकेल. त्याच्याकडे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. त्याने ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात प्रथमच नेतृत्वाची धुरा सांभाळताना गुजरात टायटन्स संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षी हार्दिकने आर्यलड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत यशस्वी कामगिरी केल्यास हार्दिक कर्णधारपदासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम करेल.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आता भारतीय संघाने भविष्याच्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक निडरता आणि आक्रमकता याची भारतीय संघात कमतरता असल्याची गेल्या काही काळापासून टीका होते आहे. सुरुवातीच्या षटकांत सावध पवित्रा घेत अखेरच्या षटकांत अधिक फटकेबाजी करण्याची भारताची योजना फारशी यशस्वी झालेली नाही. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू आक्रमकता दाखवतील अशी संघ व्यवस्थापनासह चाहत्यांनाही आशा आहे.
दुसरीकडे, श्रीलंकेचा संघही या मालिकेत दमदार कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल. श्रीलंकेने गेल्या वर्षी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे त्यांना नमवणे भारताला सोपे जाणार नाही.
हार्दिक, सूर्यकुमारवर भिस्त
हार्दिक आणि विश्वातील अव्वल ट्वेन्टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीवर भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त असेल. इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला येणे अपेक्षित आहे. सूर्यकुमार तिसऱ्या, तर हार्दिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी यांच्या स्पर्धा आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. फिरकीची धुरा सुंदरसह यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेल, तर वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक सांभाळणे अपेक्षित आहे. हसरंगा, राजपक्षेवर लक्ष श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. पथुम निसंका आणि कुसाल मेंडिस या सलामीवीरांनी २०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून श्रीलंकेला पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज भानुका राजपक्षेपासून भारताला सावध राहावे लागेल. श्रीलंकेच्या गोलंदाजीची भिस्त तारांकित लेग-स्पिनर वािनदू हसरंगा आणि फिरकीपटू महीश थीकसाना यांच्यावर असेल. हसरंगानेट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या ८ सामन्यांत १५ गडी बाद केले होते.
वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)