बर्मिगहॅम : भारताने बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकांची कमाई केली. त्यामुळे भारताला या स्पर्धेत चौथे स्थान पटकावण्यात यश आले.

भारताने यंदाच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असली, तरी त्यांना गोल्ड कोस्ट येथे २०१८ मध्ये झालेल्या गेल्या स्पर्धेतील पदकसंख्या ओलांडता आली नाही. यंदा नेमबाजीचा समावेश नसतानाही भारताच्या अन्य क्रीडाप्रकारांतील खेळाडूंनी चुणूक दाखवली. भारताने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.

भारताने बॅडिमटनमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली. अखेरच्या दिवशी पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने बाजी मारली. पुरुषांच्या दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने सुवर्णकामगिरी केली. टेबल टेनिसमध्ये अंचता शरथ कमलने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याचे या गटातील हे तिसरे सुवर्णपदक आहे. साथियानने पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवले. यंदा भारताला सर्वाधिक १२ पदके ही कुस्तीमध्ये मिळाली. तसेच वेटलिफ्टिंग, अथलेटिक्स आणि बॉक्सिंग या खेळांमधील खेळाडूंनी भारताच्या पदकसंख्येत भर घातली. भारतात फारशा प्रचलित नसलेल्या लॉन बॉल्स या खेळाने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवून दिले.   

Story img Loader