विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत भारतीय संघ येथे गुरुवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये तयारीनिशी उतरला आहे. सलामीच्या लढतीत आर्यलडविरुद्ध भारताचे पारडे जड राहील असा अंदाज आहे. साखळी गटात भारतास नेदरलँड्स व न्यूझीलंड यांच्याही आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. अन्य गटात ऑस्ट्रेलिया, स्पेन, बेल्जियम व जर्मनी यांचा समावेश आहे. आठ वेळा ऑलिम्पिक विजेतेपद मिळविणाऱ्या भारतास पहिल्या लढतीत मोठय़ा फरकाने विजय मिळविण्याची संधी आहे. ड्रॅगफ्लीकर संदीपसिंग व आघाडी फळीतील अनुभवी खेळाडू शिवेंद्रसिंग यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाची बाजू बळकट झाली आहे. एप्रिलमध्ये येथे झालेल्या निमंत्रित स्पर्धेत संदीपसिंग सहभागी झाला होता. त्यामुळे येथील वातावरणाचा फायदा त्याला घेता येईल. सरदारासिंग याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघात तरुण व अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय साधण्यात आला आहे. ड्रॅगफ्लीकर व्ही.आर.रघुनाथ याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मात्र दुखापतीमुळे दानिश मुस्तफा व गुरविंदरसिंग यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ या स्पर्धेत उतरला आहे.  
भारताची नेदरलँडबरोबर शनिवारी लढत होणार आहे तर न्यूझीलंडबरोबर त्यांना १७ जून रोजी खेळावे लागणार आहे. या स्पर्धेत पहिले तीन क्रमांक मिळविणारे संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार असल्यामुळे भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.

Story img Loader