ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॉकी मालिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्थ : भारतीय हॉकी संघाने बुधवारी डब्ल्यूए थंडरस्टिक्सचा २-० असा पराभव करत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हॉकी मालिकेत विजयी प्रारंभ केला. पर्थ हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बिरेंद्र लाकरा आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल लगावत भारताला पहिला सामना जिंकून दिला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी शानदार खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. पाचव्या मिनिटालाच जसकरण सिंगला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण त्याला अचूक फटका लगावता आला नाही. थंडरस्टिक्सच्या खेळाडूंना भारताची बचावफळी भेदता आली नव्हती. मात्र हरमनप्रीत आणि रुपिंदरपाल सिंग यांचा अडसर दूर करत त्यांनी भारताच्या गोलक्षेत्रात मजल मारली, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर आकाशदीपने मारलेला फटका थंडरस्टिक्सचा गोलरक्षक बेन रेनी याने अडवला.

दुसऱ्या सत्रावर भारताने वर्चस्व गाजवले. कर्णधार मनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांचे गोल रेनी याने अडवल्यानंतर भारताला २३व्या मिनिटाला आघाडी घेता आली. लाकराने अप्रतिम गोल करत भारताला आघाडीवर आणले. त्यानंतर थंडरस्टिक्सने पुनरामगन करण्याचे केलेले प्रयत्न भारताच्या बवाचफळीने हाणून पाडले.

दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रेनीने यश मिळू दिले नाही.

तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नसला तरी भारताने चौथ्या सत्रात दुसऱ्या गोलसाठी भरपूर प्रयत्न केले. अखेर भारताला ५०व्या मिनिटाला यश मिळाले. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी २-०ने वाढवली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India starts hockey tour of australia on a winning note
Show comments