ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप यांच्यासह यंदा भारताने आगामी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी बलाढय़ संघ उतरविला आहे. ही स्पर्धा गुआंगझु (चीन) येथे ५ ते ११ ऑगस्टदरम्यान होणार आहे.
भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष अखिलेष दासगुप्ता यांनी एका पत्रकाद्वारे भारतीय संघाची निवड जाहीर केली. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील पहिले पन्नास मानांकन लाभलेले खेळाडू भाग घेऊ शकतात. त्यानुसार पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी या पाचही गटात भारताचे प्रत्येकी दोन स्पर्धक पात्र ठरले आहेत. सायनाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर जागतिक स्पर्धेतील पदकासाठी मुख्य दावेदार आहे. मलेशियन ग्रां. प्रि. स्पर्धा व आशियाई कनिष्ठ गट विजेती पी. व्ही. सिंधू तसेच कश्यप यांच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा आहेत. स्पर्धेत उपान्त्य फेरीत स्थान मिळविणाऱ्यांचे कांस्यपदक निश्चित असते. त्यामुळेच यंदा भारतास पदकांची चांगली संधी आहे.
सायनास उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत अडचण येणार नाही. उपान्त्यपूर्व फेरीत आठवी मानांकित मिनात्सु मितानी (जपान) किंवा तेरावी मानांकित बेई युआनजू (दक्षिण कोरिया) यांच्यापैकी एका खेळाडूच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना जिंकल्यानंतर तिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली झुईरुई हिच्याशी लढत द्यावी लागण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ
पुरुष एकेरी- पारुपल्ली कश्यप, अजय जयराम.
पुरुष दुहेरी- अरुण विष्णू व तरुण कोना. अक्षय देवलकर व प्रणव चोप्रा.
महिला एकेरी- सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू.
महिला दुहेरी- अश्विनी पोनप्पा व प्रज्ञा गद्रे. सिक्की रेड्डी व अपर्णा बालन.
मिश्र दुहेरी- तरुण कोना व अश्विनी पोनप्पा. अरुण विष्णू व अपर्णा बालन.