वंदना कटारियाने केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर, भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्या चीनवर ३-१ ने मात केली आहे. या स्पर्धेतला भारतीय महिलांचा हा दुसरा विजय ठरला आहे. ४ थ्या व ११ व्या मिनीटाला गोल करत वंदना कटारियाने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. गुरजित कौरने ५१ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल केला. चीनकडून १५ व्या मिनीटाला वेन डॅनने एकमेव गोल झळकावला. या विजयासह भारतीय महिलांनी स्पर्धेत आपलं पहिलं स्थान कायम राखलेलं आहे, याआधी भारतीय संघाने जपानी महिला संघावर ४-१ अशी मात केली होती.

लिलिमा मिन्झ, नवज्योत कौर आणि वंदना यांच्यातील आक्रमक चढायांमुळे भारताला सामन्यात पहिल्याच सत्रात आघाडी घेता येणं शक्य झालं. जोर्द मरीन यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा नेमणूक करण्यात आल्यानंतर, भारतीय महिला संघाचा हा पहिलाच मोठा सामना आहे. भारतीय महिलांच्या आक्रमक खेळाला वेसण घालण चिनी महिला खेळाडूंना जमलच नाही. याचा फायदा घेत भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. भारतीय संघाची गोलकिपर सवितानेही या सामन्यात चांगला बचाव केला. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे.

Story img Loader