भारतीय संघ कोणत्याही क्षणी कच खाऊ शकतो, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आला. २-० अशा आघाडीनंतरही भारताला ऑस्ट्रेलियाकडून २-७ असा दारुण पराभव स्वीकारला. त्यामुळे जागतिक हॉकी लीगमध्ये उपांत्य फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न अधुरेच राहिले.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून निकोलस बुडजिऑन (२२व्या मिनिटाला), जेसन विल्सन (२९व्या मिनिटाला), ग्लेन टर्नर (३५व्या व ४०व्या मिनिटाला), जेकब व्हिटॉन (४५व्या  व ६५व्या मिनिटाला), रुसेल फोर्ड (४६व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताकडून वीरेंद्र लाक्रा (सहाव्या मिनिटाला) व युवराज वाल्मिकी (दहाव्या मिनिटाला) यांनी गोल केले.
 भारताने साखळी सामन्यात ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीला बरोबरीत रोखून मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. मात्र बेभरवशाची कामगिरी व भारत हे समीकरणच आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दहा मिनिटांमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती. लाक्राने सहाव्याच मिनिटाला जोरदार चाल करत भारताचे खाते उघडले. पाठोपाठ चार मिनिटांनी युवराजने ऑस्ट्रेलियाच्या बचावरक्षकांना चकवत आणखी एक गोल करत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्या वेळी भारतच हा सामना जिंकणार, असेच वाटले होते. मात्र रिक चार्ल्सवर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने त्यानंतर गोलांचा धडाका लावत सामन्याचा रंगच पालटवला. २२व्या मिनिटाला निकोलसने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. हा गोल झाल्यानंतर त्यांच्या आक्रमणाला धार आली. २९व्या मिनिटाला जेसनने गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. पूर्वार्ध संपण्यास काही सेकंद बाकी असताना ग्लेन टर्नरने ऑस्ट्रेलियाला ३-२ असे आघाडीवर नेले.
दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सातत्याने आक्रमणे करीत भारताचा बचाव पूर्णपणे निष्प्रभ केला. ४०व्या मिनिटाला टर्नरने गोल करत ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ ४५व्या व ४६व्या मिनिटाला त्यांच्या जेकब व्हिटॉन व रुसेल फोर्ड यांनी गोल करत भारताची धूळधाण केली. पाच मिनिटे बाकी असताना व्हिटॉनने आणखी एक गोल करत कांगारुंना ७-२ असा विजय दणदणीत मिळवून दिला.

Story img Loader