आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने याआधीच आपले स्थान निश्चित केले असले तरी अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या भारताला मलेशियाकडून ३-५ असा पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे.
पाकिस्तानने साखळी सामन्यात जपानचा ५-२ असा धुव्वा उडवला. आता अंतिम फेरीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या असल्या तरी गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पेनल्टी-शूटआऊटमध्ये हरवले होते.
अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी मलेशियाने भारताला सहा गोलांच्या फरकाने नमवणे आवश्यक होते. ३८व्या मिनिटापर्यंत मलेशियाने ४-० अशी आघाडीसुद्धा घेतली होती. पण नंतर गोल करण्यात आलेले अपयश त्यांना भोवले. पहिले दोन पेनल्टी कॉर्नर वाया घालवल्यानंतर मलेशियाने खाते खोलले. काही मिनिटानंतर लगेचच मलेशियातर्फे अब्दुल्ला शाहरून नाबील याने दुसऱ्या गोलाची भर घातली. मलेशियाचा युवा आघाडीवीर फितरी याने भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याला चकवत २७व्या मिनिटाला मलेशियाला ३-० असे आघाडीवर आणले. ३२व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टीकॉर्नर मिळाला. पण व्ही. आर. रघुनाथ याला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात भारताने आणखी दोन पेनल्टीकॉर्नर वाया घालवले.
दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्या मिनिटालाच भारताची बचावफळी भेदून फैझल सारी याने मलेशियासाठी चौथा गोल केला. भारतातर्फे बिरेन्द्र लाकरा याने ४७व्या मिनिटाला पहिला गोल लगावला. एस. व्ही. सुनीलच्या पासवर नवोदित खेळाडू प्रधान सोम्माना याने ६२व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावला. ६३व्या मिनिटाला रघुनाथने पेनल्टीकॉर्नरवर भारताला तिसरा गोल करून दिला. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना अझाम्मी अदाबी याने पाचवा गोल करत मलेशियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Story img Loader