भारताच्या सुमित नागल याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार खेळ करून स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुमितने त्याच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला स्वप्नवत सुरूवात केली होती. त्याने पहिल्याच सेटमध्ये टेनिसचा राजा असलेल्या फेडररला ६-४ असे पराभूत केले होते. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने सुमितविरूद्धचा सामना जिंकला खरा, पण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीचे तोंडभरून कौतुक करण्यात आले.
सर्व स्तरातून क्रीडाप्रेमींनी सुमितचे कौतुक केले. त्याने दिलेल्या निकराच्या झुंजीवर स्तुतिसुमने उधळली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीदेखील यात मागे राहिला नाही. आपल्या अनोख्या शैलीत त्याने सुमितची स्तुती केली. कोहलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुमितचा एक व्हिडीओ आणि एक फोटो पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये त्याने फेडरर विरूद्ध सुमितने पहिला सेट जिंकल्याचा क्षण बंदिस्त केला आहे.
दरम्यान, सुमित नागल हा पहिल्यांदाच रॉजर फेडररसमोर टेनिस कोर्टमध्ये उभा ठाकला होता. इतक्या बलाढ्य खेळाडू विरोधात अमेरिकन ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा सलामीची सामना खेळणे हे मोठी गोष्ट होती. पण सुमित जरासाही न घाबरता या आव्हानाला सामोरा गेला. ईतकेच नव्हे तर त्याने सलामीच्या सेटमध्ये फेडररला ६-४ अशी धूळही चारली. त्याने पहिला सेट जिंकल्यानंतर साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. फेडररसारख्या खेळाडूसोबत पहिल्याच सामन्यात पहिला सेट जिंकणे हे खूप मोठी बाब होती. त्यामुळे तो साऱ्यांच्याच चर्चेचा विषय बनला.
दुसऱ्या सेटपासून मात्र फेडररने आपला दमदार खेळ दाखवून दिला. त्याने दुसरा सेट ६-१ असा जिंकत जोरदार पुनरागमन केले. त्या सेटमध्ये सुमितला फारसा प्रतिकार करता आला नाही. तिसऱ्या सेटमध्येही फेडररने आपला जलवा दाखवत ६-२ असा सेट खि्शात घातला आणि सामन्यात आघाडी घेतली. पण चौथ्या सेटमध्ये मात्र सुमितने फेडररला पुन्हा निकराची झुंज दिली. फेडरर सहज विजय मिळवेल असे वाटत असताना सुमितने फेडररला चांगलेच झुंजवले. पण अखेर भारताच्या सुमितला पराभवाचा सामना करावा लागला.