एक्स्प्रेस वृत्तसंस्था
मुंबई : अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती आज, मंगळवारी अहमदाबाद येथे एकत्रित येऊन जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडणे अपेक्षित आहे. या बैठकीत विशेषत: संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांच्याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. या दोघांना संधी देण्यावरुन निवड समितीत संभ्रम असल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून सॅमसनला पसंती मिळेल असे यापूर्वी मानले जात होते. मात्र, आघाडीच्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांची संख्या मोठी असल्याने भारताच्या संघ व्यवस्थापनाने खालच्या फळीत खेळू शकेल अशा यष्टिरक्षकाला प्राधान्य द्यावे अशी विनंती निवड समितीकडे केल्याची माहिती आहे. अशात ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकेल. तसे झाल्यास सॅमसन आणि केएल राहुल यांना विश्वचषकाला मुकावे लागेल. मात्र, मंगळवारी निवड समितीची कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबरोबर बैठक होईल, तेव्हा सॅमसन किंवा गिल यांच्या निवडीसाठी प्रयत्न केले जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा >>>KKR vs DC : सॉल्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाताचा शानदार विजय, दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेट्सनी चारली धूळ

गेल्या शनिवारी ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना झाला. या सामन्यानंतर दिल्ली येथे रोहित आणि आगरकर यांची भेट झाल्याचे समजते. रोहित ‘आयपीएल’ सामन्यासाठी मंगळवारी लखनऊमध्ये असणार आहे. त्यामुळे तो संघनिवडीच्या बैठकीला ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे उपस्थित राहणार आहे. परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या खेळाडूंची आवश्यकता आहे, याबाबतची माहिती आधीच निवड समितीला दिल्याचे समजते.

संतुलित संघ निवडताना आगरकरच्या अध्यक्षतेखालील समितीला काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहे. पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. दुसऱ्या स्थानासाठी सॅमसन आणि राहुल यांच्यात स्पर्धा असल्याचे मानले जात होते. परंतु रोहित, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली हे फलंदाज अव्वल तीन स्थानांवर खेळणे अपेक्षित असल्याने राहुलला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. याच कारणास्तव राजस्थान रॉयल्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या सॅमसनलाही डावलले जाऊ शकेल.

तसेच गिललाही १५ सदस्यीय संघात स्थान मिळेल हे निश्चित नाही. रोहित, कोहली आणि गिल यांची फलंदाजीची शैली साधारण सारखीच असल्याचा मतप्रवाह आहे. अशात गिलला केवळ राखीव खेळाडू म्हणून निवड होण्यावर समाधान मानावे लागू शकेल. फलंदाजांमध्ये रोहित, कोहली, जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.

अष्टपैलू खेळाडूंवर भर

अंतिम ११ खेळाडूंमध्ये गोलंदाजीचे किमान सहा पर्याय असायला हवेत अशी भारतीय संघ व्यवस्थापनाची धारणा आहे. त्यामुळे १५ सदस्यीय संघात किमान तीन अष्टपैलूंची निवड करण्यावर भर असणार आहे. हार्दिक पंड्याला ‘आयपीएल’मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही विभागांत फारशी चमक दाखवता आलेली नाही. असे असले तरी वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलूंचे फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचे हार्दिकला पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईकर शिवम दुबेचेही १५ सदस्यीय संघातील स्थान जवळपास निश्चित आहे. रवींद्र जडेजाच्या रुपात फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू असेल. तसेच लेग-स्पिनर म्हणून यजुवेंद्र चहलऐवजी रवी बिश्नोईला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India team selection for the twenty20 world cup expected today sport news amy