५-१ गोलने विजय; दुसऱ्या स्थानावर झेप, एस. व्ही. सुनीलचे दोन गोल
भारत व पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना नेहमीच तणावपूर्ण व रंगतदार वातावरणात खेळला जातो. मात्र उत्कृष्ट सांघिक कौशल्याला अचूकतेची जोड देत भारताने पारंपरिक प्रतिस्पध्र्याचा ५-१ असा धुव्वा उडवला आणि अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेतील साखळी गटात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
या स्पर्धेत पदकाच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय अनिवार्य होता. भारताने या सामन्यात सांघिक समन्वय दाखवत सफाईदार विजय मिळविला. त्यांनी चार फिल्डगोल केले यावरूनच त्यांच्या आक्रमणाची धार स्पष्ट होते. उर्वरित एक गोल पेनल्टी कॉर्नरद्वारा नोंदविला गेला. भारताचा आघाडीवीर एस. व्ही. सुनीलने दोन गोल करीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताला याआधीच्या लढतीत कॅनडाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. त्या तुलनेत त्यांनी पाकिस्तानचा पुरता बिमोडच केला.
सामन्याच्या प्रारंभापासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला मनप्रीतसिंगने संघाचे खाते उघडले. एस. व्ही. सुनीलने दिलेल्या पासवर त्याने रिव्हर्स फटका मारून अप्रतिम गोल केला. अर्थात, या गोलचा आनंद फार वेळ टिकला नाही. त्यानंतर तीनच मिनिटांनी पाकिस्तानने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. त्यांचा हा गोल कर्णधार मोहम्मद इरफानने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत केला. हा गोल झाल्याचे कोणतेही दडपण न घेता भारतीय खेळाडूंनी आक्रमणाची धार कायम ठेवली. दहाव्या मिनिटाला मनप्रीत याने दिलेल्या पासवर सुनीलने अचूक गोल करत पुन्हा संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात त्यांनी ही आघाडी कायम ठेवली होती.
उत्तरार्धात भारताच्या आक्रमणाला आणखी धार चढली. सामन्याच्या ४१व्या मिनिटाला सुनीलने वैयक्तिक दुसरा गोल करत संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारताच्या चालींना आणखी गती आली. तलविंदरसिंगने भारतासाठी चौथा गोल नोंदविला. त्याने सामन्याच्या ५०व्या मिनिटाला हा गोल केला. त्यानंतर चारच मिनिटांनी भारताला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत रुपींदरपालसिंग याने भारताला ५-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. रुपींदरला आपल्या नावावर आणखी एक गोल नोंदविता आला असता, मात्र ५९व्या मिनिटाला त्याने पेनल्टी स्ट्रोकची संधी दवडली.
भारताचा हा तिसरा विजय असून अव्वल साखळी गटात त्यांचे नऊ गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चारही सामने जिंकून अव्वल स्थान घेतले आहे,. त्यांचे बारा गुण झाले आहेत. भारताचा बुधवारी गतविजेत्या न्यूझीलंड संघाशी सामना होणार आहे.

Story img Loader