भारतीय संघाने सिमरन सिंहच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट खेळ करीत अंडर १९ आशिया चषक चॅम्पिअनशिपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या संघाला हारवत चषकावर आपले नाव कोरले. भारतीय संघाने सहाव्यांदा हा चषक पटकावला आहे.
All over! INDIA U19 clinch the #AsiaCup with a dominating 144 runs win over Sri Lanka U19 in the final. India remained unbeaten in the tournament.
IND 303/3 in 50 overs
SL 160 all out in 38.4 overs pic.twitter.com/dizJDno2y9— BCCI (@BCCI) October 7, 2018
अंतिम सामन्यात भारताच्या १९ वर्षांखालील संघाने श्रीलंकेसमोर ३ बळींच्या बदल्यात ३०४ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. मात्र, हे आव्हान श्रीलंकेच्या संघाला पेलता आले नाही. त्यांचा संघ १६० धावा करीत ३८.४ षटकातच तंबूत परतला. नुकतेच भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाने बांगलादेशला हारवून आशिया चषकावर आपले नाव कोरले होते.
बांगलादेशमधील ढाका येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओपनर यशस्वी जयस्वाल (८५) आणि अनुज रावत (५७) यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. अनुजने ७९ चेंडूंमध्ये ४ चौकार तर ३ षटकार ठोकले. यशस्वीने ११३ चेंडू खेळताना ८ चौकार आणि १ षटकार लगावला. तर कर्णधार सिमरन सिंहने ३७ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ४ षटकार ठोकत ६५ धावांची नाबाद खेळी केली. त्याला आयुष बदोनीने नाबाद ५२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ११० धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेच्या संघासाठी नावोद परनाविथानाने ४८ आणि ओपनर निशान मदुश्का याने ४९ धावा केल्या. या दोघांशिवाय सुरुयाबंदाराने ३१ धावांचे योगदान दिले. भारताच्या हर्ष त्याने भेदक गोलंदाजी करीत ३८ धावा देत ६ बळी घेतले. १८ वर्षांच्या सिद्धार्थ देसाईने २ बळी घेतले.
भारताने यापूर्वी १९८९, २००३, २०१३-१४, २०१६ आणि २०१२मध्ये १९ वर्षांखालील आशिया चषक चॅम्पिअनशिप स्पर्धा जिंकली आहे. २०१२ मध्ये भारताला पाकिस्तानसोबत विजय विभागून देण्यात आला होता. त्यावेळी क्वाललांपूर येथे उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघामध्ये झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला होता.