ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी तिरंगी एकदिवसीय स्पध्रेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी साफ निराशाच केली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये तर भारतीय संघाचा १५३ धावांमध्येच खुर्दा उडाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील ‘करो या मरो’ सामन्यात भारतीय संघाला फलंदाजीची मोठी चिंता भेडसावत आहे. विराट कोहलीला चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीला आणल्याने संघाचा समतोल योग्य साधला जात असल्याचे म्हटले जात असले तरी संघाच्या धावफलकावर मात्र त्याचे कोणतेही सकारात्मक बदल दिसत नाहीत.
ब्रिस्बेन सामन्यापूर्वी धोनी म्हणाला होती की, ‘‘मधली आणि तळाची फळी अधिक मजबूत करण्यावर आमचा भर असेल. रवींद्र जडेजा संघात नसला तरी त्याची जागा स्टुअर्ट बिन्नी भरून काढेल. पण त्यामुळे सुरेश रैनाला आणि मला अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागेल.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘जर पहिले दोन फलंदाज झटपट बाद झाले तर त्याला चांगली भागीदारी रचण्याची संधी असेल. तो एका टोकाकडून दमदार फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देऊ शकतो.’’
पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोहली चुकीचे फटके मारून बाद झाला आणि त्यामुळेच त्याच्यावर टीका होत आहे. या दोन सामन्यांमध्ये त्याला अनुक्रमे ९ आणि ४ धावा करता आल्या आहेत. या अपयशानंतर कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची की तिसऱ्या स्थानावर त्याने पुन्हा यावे, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.
कोहलीने थोडय़ा उशिराने फलंदाजीला यावे असे वाटत असल्यास अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी खेळपट्टीवर काही वेळ उभे राहून धावा करणे महत्त्वाचे आहे. धवन सध्या फॉर्मात नसून त्याच्या धावा आटल्याचेच चित्र दिसत आहे. त्यामुळेच त्याला चौथ्या कसोटी सामन्यामधून वगळण्यात आले होते. आता जर एकदिवसीय मालिकेतही त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नसेल तर त्याच्याबाबत संघ व्यवस्थापनाला गंभीरपणे विचार करावा लागेल.
फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही भारताची कामगिरी चांगली होताना दिसत नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. भुवनेश्वर कुमारने चांगली कामगिरी केली असली तरी त्याच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव जाणवतो. आर. अश्विन आणि अक्षर पटेल या दोन्ही फिरकीपटूंना धावा रोखण्यात यश आले असले तरी त्यांना विकेट्स मिळवण्यात यश आलेले दिसत नाही. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजीबरोबरच गोलंदाजीवर अथक मेहनत घ्यावी लागणार आहे.