गेल्या काही महिन्यांत कामगिरीत सुधारणा केलेल्या भारतीय हॉकी संघासमोर जागतिक हॉकी लीगच्या निमित्ताने नवे आव्हान उभे ठाकले आहे. रायपूर येथे जागतिक हॉकी लीग फायनल्स स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतासमोर बलाढय़ अर्जेटिनाचे आव्हान आहे. अन्य गटाच्या लढतीत जर्मनी आणि नेदरलँड्स समोरासमोर असणार आहेत.
तुल्यबळ अशा ‘ब’ गटात अर्जेटिना, नेदरलँड्स आणि जर्मनीसह भारताचा समावेश आहे. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बेल्जियम, कॅनडा असे संघ आहेत. उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्टमन्स यांच्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत २-१ असे नमवले.
मातब्बर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पराभव झाला असला तरी भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक झाली होती. मात्र जगातील अव्वल आठ संघांमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाची खडतर परीक्षा आहे.
क्रमवारीत भारतीय संघ अर्जेटिनाच्या एका स्थानाने मागे आहे. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या पाठिंब्यात अर्जेटिनाला धक्का देण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व सरदार सिंग करत असून, पी.आर. श्रीजेश उपकर्णधारपदी असणार आहे.
बिरेंद्र लाक्रा, कोथजित सिंग, जसजीत सिंग कुलर, व्ही. आर. रघुनाथ आणि रुपिंदर पाल सिंग यांच्यावर बचावाची भिस्त आहे. रघुनाथ आणि रुपिंदर हे पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ आहेत. चिंगलेनसना सिंग कनगुजॅम, देविंदर वाल्मीकी, मनप्रीत सिंग, धर्मवीर सिंग आणि डॅनिश मुज्ताबा यांच्यावर मध्यरक्षणाची जबाबदारी आहे. एस.व्ही. सुनील, रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, तलविंदर सिंग आणि मोहम्मद आमिर आक्रमणाची धुरा सांभाळतील. दुखापतीमुळे निकीन थिमय्या आणि ललित उपाध्याय खेळू शकणार नाहीत.
विजेत्या संघाला प्रोत्साहन म्हणून चषक आणि क्रमवारीत बढती मिळेल. याव्यतिरिक्त विजेत्या संघाला २०१६ चॅम्पियन्स करंडकात थेट प्रवेश मिळेल.

Story img Loader