पीटीआय, अल रेयान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला झुंजवल्यानंतर भारतीय संघ आता आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी आज, गुरुवारी उझबेकिस्तानचा सामना करेल.

पहिल्या लढतीत भारतीय खेळाडूंनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ५० मिनिटे गोलशून्य बरोबरीत रोखून धरले होते. मात्र, अखेरीत भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. आशिया चषकात भारतीय फुटबॉल संघाने १९६४ सालानंतर एकदाही साखळी फेरीची पायरी ओलांडलेली नाही. या वेळी हा इतिहास बदलण्याची आशा बाळगून भारतीय संघ स्पर्धेत दाखल झाला आहे.

हेही वाचा >>> ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : १६ वर्षीय आन्द्रिवाचा जाबेऊरला धक्का, तिसऱ्या फेरीत धडक; सबालेन्का, गॉफचीही आगेकूच

उझबेकिस्तानला पहिल्या सामन्यात सीरियाने गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे त्यांच्या उणिवा समोर आल्या आहेत. याचा अभ्यास करून भारतीय संघ प्रथम आपला बचाव भक्कम राखेल असेच नियोजन दिसून येत आहे. ऑस्ट्रेलिया आणि उझबेकिस्तान हे दोन संघ सातत्याने फुटबॉलविश्वाच्या पटलावर चमकत असतात. विश्वचषक स्पर्धेच्याही उंबरठ्यावर ते असतात. परंतु, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या खेळानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार सुनील छेत्रीला गोलची संधी साधता आली नाही. उझबेकिस्तानविरुद्ध तो गोल करण्यासाठी उत्सुक असेल. सुनीलला मनवीर सिंगची साथही गरजेची असेल. अनुभवी संदेश झिंगन पुन्हा एकदा भारताच्या बचावाची बाजू सांभाळेल.

उझबेकिस्तानने गेल्या वर्षात चीन, ओमान, बोलिव्हिया अशा संघांना हरवले आहे, तर इराण, मेक्सिकोविरुद्धचे सामने बरोबरीत सोडवले आहेत. ते ‘फिफा’ क्रमवारीत आशियात नवव्या स्थानावर आहेत. भारताविरुद्धही उझबेकिस्तानने आतापर्यंत झालेल्या आठपैकी पाच लढतीत विजय मिळवला आहे. एकाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही उझबेकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे. उझबेकिस्तान आठव्यांदा या स्पर्धेत खेळत असून, त्यापैकी पाच स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.

उझबेकिस्तानला बरोबरीत रोखून एक गुण मिळवता आला, तरी तो भारतासाठी खूप मौल्यवान असेल.

● वेळ : रात्री ८ वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to face uzbekistan at afc asian cup zws