२०२० साली टोकियो शहरात रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरता भारतीय हॉकीसंघासमोर नामी संधी आलेली आहे. ६ ते १५ जून दरम्यान भुवनेश्वर येथे रंगणाऱ्या हॉकी सिरीज फायनल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यजमान भारतासमोर सलामीच्या सामन्यात रशियाचं आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर असून रशिया २२ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सलामीचा सामना भारताला सोपा जाईल असं म्हटलं जातंय.

या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आलेला असून, भारताला पोलंड, रशिया आणि उझबेगिस्तानचा सामना करायचा आहे. तर ब गटात दक्षिण आफ्रिका, जपान, अमेरिका आणि मेक्सिकोचा समावेश करण्यात आला आहे. ६ जून रोजी रशियाविरुद्ध सामना झाल्यानंतर, भारतीय संघाला ७ जून रोजी पोलंड आणि १० जूनरोजी उझबेगिस्तानशी दोन हात करायचे आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारताला जपानचा अपवाद वगळता एकही संघाचं आव्हान नाहीये. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी भारतीय संघासमोर ही नामी संधी असल्याचं बोललं जातंय. भारतीय हॉकी संघाचे नवनिर्वाचीत प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांच्यासमोरचं हे पहिलं मोठं आव्हान असणार आहे.

दुसरीकडे भारताचा महिला हॉकी संघही १५ ते २३ जून दरम्यान महिलांच्या हॉकी सिरीज फायनल स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिलांचा समावेश अ गटात करण्यात आलेला असून भारतासमोर पोलंड, फिजी आणि उरुग्वेचं आव्हान असणार आहे. १५ जूनला भारतीय महिलांचा पहिला सामना उरुग्वेविरुद्ध होणार आहे.

Story img Loader