कटक : तारांकित फलंदाज विराट कोहलीच्या गुडघ्याची दुखापत गंभीर नसून आज, रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन अपेक्षित आहे. मात्र, त्यामुळे भारतासमोर संघनिवडीचा पेच निर्माण झाला आहे.

भारतीय संघाने नागपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात चार गडी राखून विजय मिळवताना तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. उजव्या गुडघ्याला सूज असल्याने कोहलीला नागपूरच्या सामन्यात खेळता आले नव्हते. परंतु कोहली दुसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी शनिवारी सांगितले. कोहली तंदुरुस्त असणे भारतीय संघासाठी आनंदाची बाब असली, तरी त्याच्या पुनरागमनामुळे अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना संघ व्यवस्थापनाला अवघड निर्णय घ्यावा लागणार आहे.

पहिल्या सामन्यासाठी कोहली उपलब्ध नसल्याने डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्याचा सर्वांचा अंदाज होता. मात्र, कोहलीच्या अनुपलब्धतेमुळे मला खेळविण्यात आल्याचे सामन्यानंतर श्रेयस अय्यरने सांगितले. त्यामुळे जैस्वालला संधी देण्याची संघ व्यवस्थापनाची आधीपासूनच योजना होती. मात्र, नागपूर येथील सामन्यात जैस्वालला केवळ १५ धावा करता आल्या, तर श्रेयसने ३६ चेंडूंत ५९ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे श्रेयसला वगळणे संघ व्यवस्थापनाला अवघड जाणार आहे. जैस्वालला संघाबाहेर करण्यात आल्यास कर्णधार रोहित शर्माच्या साथीने गिल सलामीला खेळेल आणि कोहलीला आपल्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करता येऊ शकेल. याव्यतिरिक्त भारतीय संघात बदल अपेक्षित नाही.

इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

● वेळ : दुपारी १.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, स्टार स्पोर्ट्स २, जिओ सिनेमा अॅप

Story img Loader