नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अखेरच्या तुकडीला मान्यता दिल्यानंतर भारताचे ११७ खेळाडू आणि १४० सहाय्यक असे २५७ जणांचे पथक ऑलिम्पिकसाठी निश्चित झाले आहे. यामधून गोळाफेक प्रकारातील आभा खातुआचे नाव ऐन वेळी वगळण्यात आले आहे.

जागतिक क्रमवारीनुसार पात्र ठरलेल्या आभा खातुआचे नाव काही दिवसांपूर्वी जागतिक अॅथलेटिक्सकडून ऑलिम्पिक स्पर्धकांच्या अंतिम यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे भारतानेही तिच्या नावापुढे फुली मारली. तिच्या वगळण्यामागे कुठलेही कारण समोर आलेले नाही. तरी आभा उत्तेजक चाचणीत अडकली असल्याचे कारण खासगीत बोलले जात आहे.

भारतीय संघासोबत पाठविण्यात येणाऱ्या १४० सहाय्यकांच्या यादीतील ७२ जणांना सरकारी खर्चाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही खेळांच्या केंद्राजवळ असणाऱ्या हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक २०२४साठी आखण्यात आलेल्या निकषानुसार क्रीडा ग्राममध्ये केवळ ६७ व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यात येणार आहे. यामध्ये ११ सदस्य हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी असतील आणि यातील पाच हे वैद्याकीय अधिकारी असणार आहेत.

हेही वाचा >>> Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

नेमबाजीसाठी सर्वाधिक १८ सहाय्यक कर्मचारी असतील. यात एक सर्वोच्च कार्यप्रदर्शन संचालक आणि सहा प्रशिक्षकांचा समावेश असेल. हे सर्व क्रीडा ग्राममध्ये राहतील. उर्वरित ११ जणांची व्यवस्था हॉटेल्समध्ये केली जाईल. अॅथलेटिक्स (१७), कुस्ती (१२), बॉक्सिंग(११), हॉकी (१०), टेबल टेनिस (९), बॅडमिंटन (९), गोल्फ(७), अश्वारोहण (५), तिरंदाजी (४), सेलिंग (४), वेटलिफ्टिंग (४), टेनिस (३), जलतरण (२) आणि ज्युडो (१) यांच्यासाठी सहाय्यक असेल. गोल्फ स्पर्धा पॅरिसपासून ४२ किमी अंतरावर दूर असल्यामुळे संपूर्ण भारतीय गोल्फ संघ क्रीडा ग्रामऐवजी स्पर्धा केंद्राजवळील हॉटेलमध्ये राहील.

पॅरिसमधील भारतीय दूतावासातील अधिकारी एअर कमोडोर प्रशांत आर्य हे अधिस्वीकृतीधारक ऑलिम्पिक संघ सहाय्यक असतील. क्रीडा ग्राम आणि स्पर्धा केंद्रा संदर्भात असलेल्या कुठल्याही अडचणीमध्ये ते लक्ष घालतील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याखेरीज पॅरिस संयोजन समितीच्या वतीने भारतीय संघासाठी चालकांशिवाय तीन गाड्या उपलब्ध करून देणार आहे. यासाठी चालकांची निवड करण्याची जबाबदारी भारतीय दूतावासाकडे सोपविण्यात आली आहे.

या वेळी कोणाला पदकांची खात्री

टोक्योतील पदक विजेत्यांमधील पाच खेळाडूंपैकी या वेळी नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू हे पदकांच्या शर्यतीत हमखास असतील. कुस्तीपटू रवी दहिया आणि बजरंग पुनिया हे या वेळी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले नाहीत. लवलिना बोर्गोहेन (बॉक्सिंग), मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) या वेळी वजनगट बदलून सहभागी होत आहेत. आवश्यक स्पर्धात्मक अनुभव आणि पुरेशा सरावाअभावी दोघींना पदकाच्या शर्यतीत राहण्यासाठी वैयक्तिक कौशल्य पणाला लावावे लागेल. हॉकी पुरुष संघाची कामगिरी साखळीत चांगली झाल्यास ते पदकाच्या शर्यतीत शंभर टक्के राहतील. याखेरीज निकहत झरीन (बॉक्सिंग), सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी (बॅडमिंटन पुरुष दुहेरी), आदिती अशोक (गोल्फ) आणि अंतिम पंघाल (कुस्ती) हे खेळाडू नव्याने पदकाच्या शर्यतीत राहतील. सर्वात विशेष म्हणजे यावेळी भारताचे २१ नेमबाज २७ प्रकारांसाठी पात्र ठरले असून, यापैकी किमान दोन तरी पदके मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सिफ्त कौर सामराकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एअर रायफल प्रकारातील मिश्र दुहेरीचे पदक निश्चित होईल. यामध्ये भारतीय अपेक्षा राखून असतील.

Story img Loader