आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांच्या झालेल्या चर्चेत दौऱ्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
श्रीनिवासन आणि नेन्झानी यांच्या झालेल्या बैठकीत भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या दौऱ्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एका सराव सामन्याचा समावेश असेल, असे सूत्रांकडून समजते.
जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयने त्याबाबत प्रतिकूलता दर्शवल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता. हा दौरा झाला नाही तर दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला मोठे नुकसान होईल, याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे बीसीसीआयशी वैमनस्य असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी हारून लॉरगेट यांना दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने प्रदीर्घ सुटीवर पाठवले आहे. आता २६ ऑक्टोबरला चेन्नईत होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या दौऱ्यावर शिक्कामोर्तब होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to tour south africa for 2 tests 3 odis