लॉर्ड्स कसोटीत भारताला इंग्लंडकडून डावाने पराभव स्विकारावा लागला. यानंतर अनेक माजी खेळाडूंनी भारताच्या संघनिवडीवर टीका केली होती. वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू मायकल होल्डिंग यांनी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या खेळावरही आपल परखड मत व्यक्त केलं होतं. “हार्दिकच्या खेळामध्ये सातत्य नाही. याचसोबत गोलंदाजीत फारसं वैविध्यही नाहीये. गोलंदाजाला अडचणीत टाकेल असे चेंडू तो टाकत नाही.” कसोटी क्रिकेटमध्ये हार्दिकला अष्टपैलू होण्यासाठी अजुन बराच वेळ लागणार आहे, असं म्हणत होल्डिंग यांनी पांड्याला टीकेचं धनी बनवलं होतं.

अवश्य वाचा – कपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या

मात्र ट्रेंट ब्रिजच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात, हार्दिक पांड्याने आपल्या सर्व टीकाकारांची तोंड बंद केली. पहिल्या डावात हार्दिकने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडला. या कामगिरीनंतर समालोचनाची जबाबदारी सांभाळणारा इंग्लंडचा माजी खेळाडू नासिर हुसेनने पांड्याशी संवाद साधला. यावेळी कामगिरीवरुन होत असलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता, “माझ्याबद्दल काळजी करु नका, मी काय करतोय याची मला कल्पना आहे. लोकं माझ्याबद्दल काय म्हणतात याकडे मी लक्ष देत नाही. माझ्या संघातल्या सहकाऱ्यांचा मला पाठींबा आहे”, असं म्हणत हार्दिकने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.

दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत गेले. भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली.

अवश्य वाचा – Ind vs Eng : हार्दिक पांड्या, ऋषभ पंत चमकले; दुसऱ्या दिवशीच्या खेळात ६ विक्रमांची नोंद

Story img Loader