Ins vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केलं आहे. हार्दिक पांड्याने पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत भारताचं सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. सध्या भारताकडे २९२ धावांची भक्कम आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. पुढे इंग्लंडच्या डावाला स्थैर्य मिळत असल्याचे वाटत असतानाच नवोदित ओली पोप बाद झाला. यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत गेले. दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या खेळात तब्बल ६ विक्रमांची नोंद करण्यात आली.

० – इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना ३०० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर भारत आतापर्यंत एकही कसोटी सामना हरलेला नाहीये.

५ – पहिल्या डावात यष्टींमागे ऋषभ पंतने ५ झेल घेतले. आशियाई यष्टीरक्षकाने कसोटी पदार्पणात सर्वाधिक झेल घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

७ – हार्दिक पांड्याची गोलंदाजीतली ५/२८ ही कामगिरी इंग्लंडमधली भारतीय गोलंदाजांची सातवी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

१० – इशांत शर्माने अॅलिस्टर कूकला बाद करण्याची (गेल्या १५ कसोटी सामन्यांचा निकष) ही दहावी वेळ ठरली. यासह इशांतने आपला सहकारी रविचंद्रन आश्विन आणि ट्रेंट बोल्ट, मिचेल जॉन्सन या गोलंदाजांना अॅलिस्टर कुकला सर्वाधीक वेळा बाद करण्याच्या यादीत मागे टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा मॉर्ने मॉर्कल या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने कुकला १२ वेळा बाद केलं आहे.

२८ – पहिल्या डावात ५ बळी घेताना हार्दिक पांड्याने अवघ्या २८ धावा मोजल्या. कोणत्याही भारतीय गोलंदाजाची इंग्लंडमधली ही सर्वात किफायतशीर गोलंदाजी ठरली आहे.

३२९ – २०१८ सालात बाहेरच्या मैदानावर भारताची पहिल्या डावातली ३२९ ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सेंच्युरियन कसोटीत भारताने ३०७ धावा केल्या होत्या.

Story img Loader