टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा – विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती देऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आयर्लंड दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी दिली आहे. बीसीसीआयने काही वेळापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेद्वारे भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करणार आहे.
दुखापतीमुळे तब्बल एक वर्ष संघापासून दूर असलेला बुमराह आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. विशेष म्हणजे, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराहकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तर मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड संघाचा उपकर्णधार असेल.
भारतीय संघ १८, २० आणि २३ ऑगस्ट रोजी आयर्लंडविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. हे तिन्ही संघ डब्लिनमध्ये खेळवले जातील.
आयर्लंड दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
निवड समितीने भारतीय संघातील नियमित खेळाडू आणि नियमित कर्णधाराला विश्रांती दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.