पहिले 3 सामने गमावल्यानंतर यजमान न्यूझीलंडने आपला पहिला विजय नोंदवला आहे. हॅमिल्टन वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 8 गडी राखून मात केली. भारताने विजयासाठी दिलेलं 93 धावांचं आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सामन्यात 2 बळी घेतले. या विजयासह न्यूझीलंडने भारताचं मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत खेळणारा भारतीय संघ आजच्या सामन्यात पुरता उघडा पडला.
त्याआधी, चौथ्या सामन्यात भारतीय संघाला खऱ्या अर्थाने कडवी टक्कर मिळाली आहे. हॅमिल्टनच्या मैदानात ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोमच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हवेत वळणाऱ्या चेंडूवर भारतीय संघाची अक्षरशः दाणादाण उडाली. एका क्षणापर्यंत धावफलकावर 50 धावा लागायच्या आधी भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यामुळे भारत वन-डे क्रिकेटमध्ये आपला नवा निच्चांक नोंदवतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र हार्दिक पांड्याने भारतावर आलेली ही नामुष्की टाळली. मात्र तो ही फारकाळ खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. अखेर भारताने 92 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवलं.
चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी झटपट माघारी परतली. आपल्या कारकिर्दीचा 200 वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या 7 धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 10 षटकात 21 धावांमध्ये 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 10 षटकात 26 धावांमध्ये 3 बळी घेतले. या दोघांना टॉड अॅस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली
न्यूझीलंड 8 गडी राखून विजयी
यष्टीरक्षक दिनेश कार्तिकडे झेल देऊन विल्यमसन बाद
भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा वसूल केल्यानंतर गप्टील झेलबाद
जिमी निशमने उडवला अहमदचा त्रिफळा, किवींना विजयासाठी 93 धावांचं आव्हान
टॉड अॅस्टलने घेतला कुलदीपचा बळी
कुलदीप आणि चहलने नवव्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी रचत. भारतावर आलेली नामुष्की टाळली
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लॅथमकडे झेल देऊन पांड्या माघारी, भारताचा अखरेचा भरवशाचा फलंदाज तंबूत परतला
कॉलिन डी-ग्रँडहोमने उडवला भुवनेश्वरचा त्रिफळा
पायचीत होऊन केदार जाधव माघारी, भारतीय संघाची हॅमिल्टनच्या मैदानावर दाणादाण
स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याच्या नादात शुभमन गिल बोल्टकडे झेल देऊन माघारी परतला
दिनेश कार्तिकही ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर माघारी, भारताची आघाडीची फळी सपशेल अपयशी
कॉलिन डी ग्रँड होमच्या गोलंदाजीवर रायुडू भोपळा ही न फोडता माघारी. भारताला तिसरा धक्का
बोल्टने आपल्याच गोलंदाजीवर रोहित शर्माचा सुरेख झेल पकडला
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर शिखर पायचीत
विराट कोहलीच्या जागी शुभमन गिलला संघात स्थान
मोहम्मद शमीला विश्रांती देऊन खलिल अहमदला संघात संधी