सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३३ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ७ गडी राखत भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन तर इश सोधीने १ बळी घेतला, मात्र भारतीय फलंदाजांवर अंकुश लावण त्यांना जमलं नाही.
भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर विराट यष्टीरक्षक सेफर्टकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि शिवम दुबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून लोकेश राहुलने नाबाद ५७ तर श्रेयस अय्यरने ४४ धावा केल्या.
त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडचा संघ १३२ धावांपर्यंत मजल मारु शकला. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुनही दिली होती. मात्र भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये दमदार पुनरागमन केलं.
मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो जोडीने पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने गप्टीलला माघारी धाडलं. यानंतर काही काळाने कॉलिन मुनरोही माघारी परतला. कर्णधार केन विल्यमसनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने डी-ग्रँडहोम आणि विल्यमसन यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं.
रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. भारताकडून रविंद्र जाडेजाने २ तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
७ गडी राखून न्यूझीलंडवर केली मात, मालिकेतही २-० ने आघाडी
इश सोधीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर उभ्या असलेल्या साऊदीच्या हाती झेल देऊन अय्यर बाद
श्रेयस अय्यरची ४४ धावांची आक्रमक खेळी
न्यूझीलंडच्या गोलंदाजांची राहुलकडून धुलाई, श्रेयस अय्यरसोबत महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी
भारताने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक सेफर्टच्या हातात
विराट केवळ ११ धावा करुन माघारी परतला, भारताला दुसरा धक्का
सलग दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा अपयशी, अवघ्या ८ धावा काढून परतला माघारी
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर रॉस टेलरने घेतला रोहितचा झेल
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यापुढं न्यूझीलंडच्या फलंदाजांची दैना झाली. न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत पाच बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला विजयासाठी १३३ धावांचे लक्ष आहे.
१६ षटकानंतर न्यूझीलंडनं ११० धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजापुढं न्यूझीलंडची फलंदाजी ढासळली. भारताकडून जाडेजानं दोन बळी घेतले आहेत. तर शार्दुल आणि शिवम दुबेनं प्रत्येकी एक एक बळी घेतला.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं न्यूझीलंडच्या आघाडीच्या फळीनं नांगी टाकली आहे. १३ षटकानंतर न्यूझीलंडने चार गड्यांच्या मोबदल्यात ८४ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
कॉलिन डी-ग्रँडहोम रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर माघारी
शिवम दुबेनं न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. सलामी फलंदाज कॉलिन मुनरो विराटकडे झेल देत बाद झाला. मुनरोनं २५ चेंडूत २६ धावा केल्या. नऊ षटकानंतर न्यूझीलंडच्या दोन बाद ६९ धावा झाल्या आहेत.
पावरप्लेच्या अखेरच्या षटकांत धावांची गती वाढवण्याच्या नादात न्यूझीलंडचा सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल विराट कोहलीकडे झेल देत बाद झाला. मार्टिन ग्पिटलनं २० चेंडूत ४४ धावांची खेळी केली. सहा षटकानंतर न्यूझीलंडने एक गड्यांच्या मोबदल्यात ४९ धावा केल्या आहेत.
पहिल्या सामन्यातील विजयी संघ भारताने उतरवला आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सहा गड्यांनी पराभव केला होता.